
अवधूत गुप्ते, पुष्कर श्रोत्री, संस्कृती बालगुडे, अभिनय बेर्डे यांचा रंगतदार जलवा
पिंपरी चिंचवडमध्ये जुलै महिन्याची सुरुवात दणक्यात होणार असून, सन मराठी प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा भव्य कार्यक्रम १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे रंगणार आहे. महाराष्ट्राचा रॉकस्टार अवधूत गुप्ते, अभिनय क्षेत्रातील गुणी कलाकार पुष्कर श्रोत्री, संस्कृती बालगुडे, अभिनय बेर्डे, जान्हवी किल्लेकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत.
संपूर्ण कुटुंबासाठी नृत्य, संगीत, हसण्याचा बहारदार अनुभव
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री करणार असून, अवधूत गुप्तेची जिवंत ठसकेबाज मैफिल प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणार आहे. त्याच्या लोकप्रिय गाण्यांवर पिंपरी चिंचवडकर थिरकणार हे निश्चित. त्याचबरोबर नृत्य, संगीत, हास्य आणि थेट कलाकारांशी संवाद यांचा बहारदार संगम अनुभवता येणार आहे. सन मराठीच्या कलाकारांसोबत सेल्फी घेण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे.
जबरदस्त परफॉर्मन्स – जान्हवी, संस्कृती, अभिनय, मुग्धा, तृप्ती खामकर यांचा जलवा
अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची मोहक अदा, संस्कृती बालगुडेचा डान्स, अभिनय बेर्डेचा स्टायलिश परफॉर्मन्स, गायिका मुग्धा गराडेची सुरेल गाणी आणि स्टँडअप कॉमेडियन तृप्ती खामकरचा विनोदी ठसका या कार्यक्रमात रंग भरणार आहे.
‘तुझ्यासाठी तुझ्यासंग’ मालिकेतील तेजा आणि वैदहीचा रोमँटिक डान्स ठरणार विशेष आकर्षण
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे ‘तुझ्यासाठी तुझ्यासंग’ मालिकेतील तेजा आणि वैदहीचा रोमँटिक डान्स परफॉर्मन्स. या सुंदर सादरीकरणामुळे कार्यक्रमात प्रेमाची लहर उसळणार आहे आणि संपूर्ण वातावरण उत्साही आणि हृदयस्पर्शी होणार आहे.
प्रवेश विनामूल्य, मात्र जागा मर्यादित – लवकर या, आनंद घ्या
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे, मात्र जागा मर्यादित असल्यामुळे प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. ही बातमी किंवा त्याचा फोटो ‘पास’ म्हणून दाखवूनही प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासह या सांस्कृतिक मेजवानीचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा आणि १ जुलै २०२५ ची संध्याकाळ संस्मरणीय बनवा!
