
‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाट्याचा भव्य प्रिमियर सोहळा नुकताच मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी सिनेनाट्य, साहित्य, राजकारण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या कलाकृतीला शुभेच्छा दिल्या.
‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ची सांस्कृतिक भेट
ज्येष्ठ लेखक कै. मधुसूदन कालेलकर यांच्या स्मृतीस अर्पण म्हणून गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश चौधरी यांनी स्थापन केलेली ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ ही संस्था ‘थिएटरऑन एंटरटेनमेंट’ आणि ‘पीएसडीजी स्टुडिओज प्रोडक्शन’च्या सहकार्याने हे नाटक रंगमंचावर घेऊन आली आहे. या संस्थेला परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
फुलवा आणि आस्मा खामकर यांचा रंगमंचीय जादूई प्रवास

या नाटकाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि त्यांची कन्या आस्मा खामकर. त्यांच्या संगीतमय अभिनयात प्रेक्षकांना नृत्य, अभिनय आणि भावनांची एक सुरेख अनुभूती मिळते. त्यांच्या जोडीला ओंकार गोखले देखील प्रभावी भूमिकेत दिसतो. या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी यांचे असून दिग्दर्शन विराजस कुलकर्णी आणि सूरज पारसनीस यांनी संयुक्तपणे केले आहे.
संपूर्ण टीमचं नाट्यरसिकांकडून भरभरून कौतुक
‘एक तिची गोष्ट’ हे नाव जितकं आत्मीयतादर्शक आहे, तितकंच हे नाटक भावनिक आणि दृश्यात्मक पातळीवर वेगळेपण घेऊन येतं. याच्या सादरीकरणातली उर्जा, संगीत, नृत्य आणि अभिनय यामुळे नाटकाला रसिकांकडून विशेष प्रतिसाद मिळत आहे. नाटकाचा रंग पुढे पुढे अधिकच खुलत जाणार, हे निश्चित!
संगीत, स्वर, आणि भावनांची गुंफण
या नाटकासाठी आर्या आंबेकर, वैशाली सामंत आणि ऋषिकेश रानडे यांनी गायन केलं असून संगीत निषाद गोलांब्रे यांचे आहे. चाळीशीतली अनया आणि तिच्या आयुष्यात अचानक आलेली एक किशोरवयीन मुलगी – या दोन स्त्री पात्रांच्या भावविश्वातून नाटकाची कथा उलगडते.

ही कथा फक्त ‘तिची’ नसून, अनेक ‘तिच्यांची’ गोष्ट आहे – उत्कटतेने, लयबद्धतेने आणि नृत्याच्या माध्यमातून रंगमंचावर सादर झालेली एक कलात्मक अनुभूती!
