
दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात रूपेरी पडद्यावर
‘चिमणराव’ ते ‘तात्या विंचू’ – असंख्य बहारदार भूमिका साकारणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. “दशावतार” या आगामी चित्रपटात कोकणच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या सस्पेन्स थ्रिलर कथेत ते एक अत्यंत महत्त्वपूर्ण पात्र साकारत आहेत. त्यांच्या याआधीच्या सर्व भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे आणि यंदाही ते प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार, याबाबत खात्री आहे.
निसर्ग, लोककला आणि गूढतेचा थरारक मिलाफ
झी स्टुडिओज् प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी तसेच ओशन आर्ट हाऊस निर्मित “दशावतार” हा चित्रपट कोकणातील रम्य निसर्ग, स्थानिक रूढी, मान्यता, आणि पारंपरिक लोककला यांचे भावपूर्ण दर्शन घडवतो. त्यात सस्पेन्स, गूढता आणि उत्कंठावर्धक कथानकाची जोड देत एक वेगळीच सिनेमॅटिक अनुभूती देतो.
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांची सर्जनशील मांडणी

चित्रपटाचे लेखन, पटकथा आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून त्यांनी कोकणात घडणाऱ्या एका गूढ कथेवर ‘दशावतार’ची बांधणी केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सुबोध खानोलकर, सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, आणि विनायक जोशी यांचा समावेश आहे. अजित भुरे यांनी चित्रपटाच्या कला विभागाची धुरा सांभाळली आहे.
चित्रपटगृहांत १२ सप्टेंबरला भेट
“दशावतार” हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, या भव्य कलाकृतीची पहिली झलक लवकरच झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कोकणच्या मातीतील ही अद्भुत गोष्ट आणि दिलीप प्रभावळकर यांचा नव्याने साकारलेला गूढ अवतार पाहण्यासाठी रसिक नक्कीच उत्सुक आहेत.
