जयंत- जान्हवीच्या आयुष्यात बबुचकाची एन्ट्री

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सशाच्या आगमनाने उत्सुकता वाढली

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नुकताच एका आगळ्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. तो पाहुणा म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून, एक छोटासा गोंडस ससा आहे! सिद्धू-भावनांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर या सशाची एन्ट्री झाली असून जयंत आणि जान्हवी यांच्या आयुष्यात त्याने वेगळाच रंग भरला आहे.

बबुचका – जान्हवीच्या मनात घर केलेला ससा

जान्हवीला आनंदीला वाचवायला जाताना हा ससा दिसतो आणि ती त्याच्यावर एकदम फिदा होते. तिच्या आनंदासाठी जयंत तो ससा घरी घेऊन येतो आणि त्याचे नाव जान्हवी प्रेमाने ‘बबुचका’ ठेवते. छोट्या पाहुण्याने मालिकेच्या कथा-पटात गोड बदल घडवून आणला आहे.

मेघन जाधवसाठी पहिला प्राण्यांसोबतचा अनुभव

जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधव याने सांगितलं, “माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीत मी पहिल्यांदाच एका प्राण्यासोबत शूट करत आहे. सश्यासोबत काम करणं मजेशीर असून एक वेगळाच अनुभव आहे. ती ससा मादी आहे आणि लहान असल्याने आम्ही तिची काळजी बाळासारखी घेतो.”

दिव्या पुगावकरला सश्यासोबतचा अनुभव थोडा वेगळा

जान्हवीच्या भूमिकेत असलेली दिव्या पुगावकर सांगते, “सशासोबत शूट करणं तितकंच कठीण आहे कारण त्याला वेळेवर खायला द्यावं लागतं आणि त्याला उचलून घेतलं जास्त आवडत नाही. तो मोकळं खेळणं पसंत करतो. त्यामुळे आम्हाला त्याची सवयी लक्षात ठेवून शूट करावं लागतं.”

झी मराठी टीमचा कौतुकास्पद प्रयोग

सश्याच्या शूटिंगसाठी झी मराठी टीमने सर्व काळजीपूर्वक उपाययोजना केल्या आहेत. सेटवरील उपकरणांपासून त्याला कोणताही धोका होऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. बबुचकाची ही उपस्थिती मालिकेच्या वातावरणात गोडवा आणणारी ठरत आहे.

बघायला विसरू नका ‘लक्ष्मी निवास’ – दररोज रात्री ८ वा. झी मराठीवर

बबुचका आल्याने जयंत आणि जान्हवीच्या आयुष्यात नेमकं काय बदल होणार आहे, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे.

Leave a comment