
संध्याकाळी ६ वाजता मिळवला सर्वोच्च टीव्हीआरचा मान
स्टार प्रवाहवरील ‘माऊली महाराष्ट्राची’ या भक्तिपर कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. पंढरपूरच्या वारीचा थेट अनुभव घरबसल्या देणाऱ्या या कार्यक्रमाला संध्याकाळी ६ वाजेच्या स्लॉटमध्ये टीव्हीआरच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रेक्षक मिळाले.
१.१४ कोटी प्रेक्षकांनी अनुभवला घरबसल्या वारीचा सोहळा
सुमारे १.१४ कोटी प्रेक्षकांनी स्टार प्रवाह नेटवर्कवरून माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमाद्वारे वारीचा आनंद घेतला. ज्यांना प्रत्यक्ष वारीत सहभागी होता आलं नाही, त्यांना घरबसल्या या दिव्य यात्रेचा भाग होण्याची संधी मिळाली.

पालखीपासून बंधूभेटपर्यंत संपूर्ण वारीचं दर्शन
या कार्यक्रमात दिंड्या, भक्तीमय पायी चालणं, पालखीचा बैलरथ, रिंगण, अश्व, पर्यावरणपूरक वारी, सुश्रुषा वारी, अन्नपूर्णा वारी, कर्तव्य वारी, सेवावारी, बंधूभेट — या सगळ्या पैलूंनी प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं वारीचा अनुभव दिला.
आदेश बांदेकरांनी व्यक्त केली प्रेक्षकांप्रती कृतज्ञता

या अपूर्व यशाबद्दल कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि निर्माते आदेश बांदेकर यांनी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. त्यांनी सांगितलं की, “आळंदी ते पंढरपूर अशी संपूर्ण वारी करता आली, ही अनेक वर्षांची इच्छा होती. कलाकार म्हणून नव्हे, तर वारकरी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली. विठुरायाच्या कृपेने हे कार्य सुफळ संपूर्ण झालं, याचा खूप आनंद आहे.”
