बँकर ते सुप्रसिद्ध गायक – अमेय डबली यांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी

‘कृष्णा : म्युझिक, ब्लिस अँड बियॉन्ड’ कार्यक्रमाची देशभरात चर्चा
सध्या महाराष्ट्रासह देशभरात गायक अमेय डबली यांच्या ‘कृष्णा : म्युझिक, ब्लिस अँड बियॉन्ड’ या संगीतमय कार्यक्रमाची मोठी चर्चा होत आहे. भक्ती, अध्यात्म आणि संगीत यांचा संगम असलेला हा कार्यक्रम केवळ एक कॉन्सर्ट नसून, भगवान श्रीकृष्णाच्या तत्त्वज्ञानावर आधारित एक आत्मिक अनुभव आहे.

४,००० हून अधिक मैफिली, अनेक दिग्गजांसोबत मंच वाटलेला कलाकार
या कार्यक्रमामागे उभे असलेले अमेय डबली हे बहुपरिचित आणि बहुमुखी कलाकार आहेत. त्यांनी जगभरात ४,००० हून अधिक मैफिली सादर केल्या असून, ए. आर. रहमान, उस्ताद झाकीर हुसेन, शान आणि पं. राकेश चौरासिया यांसारख्या नामवंत कलाकारांसोबत एकाच मंचावर गाण्याची संधी मिळवली आहे.

आईकडून सुरुवात, शिक्षणातही यशस्वी
वयाच्या पाचव्या वर्षी आई डॉ. अनुराधा डबली यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या या शिष्या मुलाच्या सुरांचे पहिले गुरू ठरल्या. त्याच वेळी शिक्षणातही गोडी असल्यामुळे अमेय यांनी केमिकल इंजिनिअरिंग आणि MBAचे शिक्षण पूर्ण केलं.

नोकरी सोडून संगीताचा ध्यास घेतला
शिक्षणानंतर त्यांनी बँकेत नोकरी स्वीकारली. मात्र मन मात्र सतत संगीताच्या दिशेने ओढ घेत होते. अखेर त्यांनी नोकरीचा राजीनामा देत संगीत क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांच्या पाठबळामुळे आणि स्वतःच्या मेहनतीमुळे हा प्रवास शक्य झाला.

कॉर्पोरेट ट्रेनिंग, मेडिटेशन आणि मेंटल हेल्थ क्षेत्रातही कार्यरत
आज अमेय डबली हे केवळ गायक नाही, तर एक प्रेरणादायी ट्रेनर आणि लाईफ कोच आहेत. तरुणांसाठी ते मेडिटेशन आणि संगीत कार्यशाळा घेतात. कॉर्पोरेट क्षेत्रासाठी लीडरशिप ट्रेनिंग करतात. गेल्या ९ वर्षांत त्यांनी सशस्त्र दलासाठी १७५ हून अधिक कार्यक्रम घेतले आहेत.

एकम सत फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य
‘Ekam Satt Foundation’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यही करत आहेत. २०२२-२३ या वर्षात त्यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ६७ कार्यक्रम सादर केले.

सर्व शैलीत सहज गाणारा बहुपरंगी कलाकार
अमेय डबली यांची खासियत म्हणजे विविध संगीत शैलीतील सहजता. भक्तिगीत, हिंदी चित्रपटसंगीत, गझल, सूफी, लोकसंगीत आणि इंग्रजी सॉफ्ट रॉक हे सर्व प्रकार ते तितक्याच ताकदीने सादर करतात.

जमशेद भाभा थिएटरमध्ये १९ जुलैला विशेष कार्यक्रम
या कार्यक्रमाचा पुढचा भाग येत्या १९ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए, नरीमन पॉइंट, मुंबई येथे होणार आहे. ‘कृष्णा : म्युझिक, ब्लिस अँड बियॉन्ड’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना एका सुरेल आध्यात्मिक प्रवासाची अनुभूती मिळणार आहे.

Leave a comment