
१९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार
तंत्रज्ञान, दळणवळण, शिक्षण आणि आर्थिक स्थिती या सगळ्या बाबतीत गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. या बदलांमुळे नव्या पिढीच्या अपेक्षा आणि दृष्टिकोनही लक्षणीय रीतीने बदलले आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपट एका लग्नाच्या गोष्टीवर आधारित रंजक प्रवास दाखवणार आहे.
प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले यांची प्रमुख भूमिका
या चित्रपटात प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर आणि वैभव मांगले प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यांच्यासोबत सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर आणि साईंकित कामत यांसारखी दमदार स्टारकास्टही आहे. या कलाकारांच्या सशक्त अभिनयातून ही गोष्ट अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
दर्जेदार सिनेनिर्मितीसाठी प्रयत्नशील टीम
सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स या बॅनरखाली ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ची निर्मिती करण्यात आली आहे. अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे आणि एम. व्ही. शरतचंद्र हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
दिग्दर्शन, लेखन आणि तांत्रिक बाजू
चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केलं असून कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजित आमले यांनी केलं आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांचं छायांकन, विजय कलमकर यांचं संकलन, तर अविनाश सोनावणे यांनी ध्वनी मुद्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. चंचल काळे आणि अमरजित आमले यांनी लिहिलेली गीते अक्षय खोत यांच्या संगीत दिग्दर्शनात सजली आहेत. पार्श्वसंगीतही अक्षय खोत यांनीच दिलं आहे. चित्रपटाचे वितरण पिकल इंटरटेनमेंट करणार आहे.
गावाकडील लग्नसंस्थेतील बदलांचा आरसा
गेल्या काही वर्षांत गावातील तरुणांची लग्नं जुळवणे ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. या संकल्पनेचा वेध घेऊन ‘कुर्ला टू वेंगुर्ला’मध्ये शहर आणि गाव यांच्या जीवनशैलीतील फरक, पालकांच्या अपेक्षा आणि तरुणांच्या आकांक्षा यांच्यातील संघर्ष अत्यंत मनोरंजक शैलीत सादर केला आहे.
मालवणी भाषेचा गोडवा आणि लोकजीवनाची झलक
चित्रपटात मालवणी भाषेचा तडका आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीचं चित्रण पाहायला मिळणार आहे. प्रत्येक घराशी नातं सांगणारी, हलकीफुलकी आणि तरीही विचारप्रवृत्त करणारी कथा या चित्रपटात पाहायला मिळेल.
१९ सप्टेंबरपासून चित्रपटगृहात
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा हा चित्रपट १९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. गाव-शहराच्या पुलावर उभा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान नक्कीच निर्माण करेल.
