‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित

८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार सती प्रथेवर आधारित चित्रपट

‘सत्यभामा – अ फरगॉटन सागा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांना आपल्या समाजाच्या भूतकाळातील विचारसरणीचे आणि सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवणार आहे. एकोणिसाव्या शतकातील सती प्रथेवर आधारलेला हा चित्रपट त्या काळातील सामाजिक अन्याय आणि स्त्रीशोषणावर भाष्य करतो. चित्रपटात निस्वार्थ प्रेम, बंधनांची सुंदर वीण आणि सामाजिक लढ्याचा भावनिक प्रवास एकत्र गुंफला आहे.

प्रेक्षकांच्या भेटीला आलेला भावस्पर्शी टिझर

या चित्रपटाचा टिझर अलीकडेच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली आहे. हिरवा शालू घेऊन नटलेला निसर्ग, पांढऱ्या धुक्याच्या कुशीतली रम्य सकाळ, मंदिरात राखी बांधण्याचा भावनिक क्षण – हे सारे दृश्य टिझरमध्ये प्रभावीपणे टिपले गेले आहेत. यातून सतीप्रथेच्या पाशवी वास्तवाची झलकही दिसते. “एक असहाय्य स्त्री समाजाशी एकटी कशी लढू शकेल” आणि “मी सती प्रथेविरोधात लढा देणार” यांसारख्या संवादांमधून चित्रपटाचा आशय ठळकपणे समोर येतो.

भाऊ-बहिणीच्या नात्याला कलात्मक सलामी

९ ऑगस्टला रक्षाबंधन असताना त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ८ ऑगस्टला ‘सत्यभामा’ प्रदर्शित होत आहे. त्यामुळे हा चित्रपट भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम, समर्पण आणि त्याग अधोरेखित करणार आहे. दिग्दर्शकांच्या मते, हा चित्रपट केवळ नात्याची गोष्ट सांगणारा नसून, सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आहे.

दिग्दर्शक-द्वयी आणि तगडी निर्मिती टीम

श्री साई सृष्टी फिल्म्स एलएलपी प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मनीषा पेखळे, सारंग मनोज, अंकुर सचदेव आणि वीरल दवे यांनी केली आहे. दिग्दर्शन सारंग मनोज आणि अभिजीत झाडगावकर यांनी संयुक्तपणे केलं असून, कथा-पटकथा-संवाद लेखन मनीषा पेखळे यांचं आहे. चित्रपट सामाजिक वास्तव आणि ऐतिहासिक सत्य यांच्या आधारावर तयार करण्यात आला आहे.

तगडी स्टारकास्ट आणि तांत्रिक बाजू

या चित्रपटात माधव अभ्यंकर, अभिजीत आमकर, भाविका निकम, सृष्टी मालवंडे, ज्योती पाटील, सारंग मनोज, ज्ञानेश्वर शिंदे, मुकुंद कुलकर्णी, दिपाली आणि योगेश कंठाळे आदी कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ऋषिका सूर्यवंशी, अर्नव शिंदे, लोकेश देवकर, अर्नव तेलंग हे बालकलाकार देखील दिसणार आहेत. संगीत निखिल महामुनी यांचं असून, गीतं मनीषा पेखळे यांनी लिहिली आहेत.

दृश्य आणि तांत्रिक सौंदर्याचं कसब

चित्रपटाचे छायांकन जितेंद्र रामचंद्र आचरेकर, संकलन निलेश गावंड, कला दिग्दर्शन सचिन एच. पाटील, कोरिओग्राफी नरेंद्र पंडीत, पार्श्वसंगीत हनी सातमकर, वीएफएक्स सुमीत ओझा यांनी सांभाळले आहे. मेकअप नितीन दांडेकर, कॉस्च्युम डिझायनिंग शीतल लीना पावसकर, स्टाईलिंगही त्यांचं आहे. साहसदृश्ये मोहित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रीत करण्यात आली आहेत. प्रोडक्शन कंट्रोलर अकबर शेख, कास्टिंग समन्वयक कुंडलिक कचले आहेत.

इतिहासातील जळजळीत सत्य रुपेरी पडद्यावर

‘सत्यभामा’ हा चित्रपट समाजातील विस्मरणात गेलेल्या एका वास्तव घटनाक्रमावर आधारित असून, तो प्रेक्षकांना एका वेगळ्या भावनिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. सती प्रथेचा विरोध, भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं सामर्थ्य आणि एका स्त्रीचा आत्मशोध यांची अनोखी गुंफण असलेला ‘सत्यभामा’ ८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात पाहायला विसरू नका.

Leave a comment