अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

लोकल प्रवासात फुलणारी प्रेमाची गोष्ट “मुंबई लोकल” १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात

मुंबईच्या जीवनशैलीला आरसा ठरणाऱ्या लोकल ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘मुंबई लोकल’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत लाँच करण्यात आला. ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं असून बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्स यांनी याची निर्मिती केली आहे. निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी हे निर्माते असून त्र्यंबक डागा हे सहनिर्माते आहेत.

प्रेमकथेचा प्रवास सुरू होतो मुंबई लोकलच्या गर्दीतून

या चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर झळकणार आहे. आयुष्यातील सर्व काही हरवलेल्या ‘ती’ आणि प्रत्येक लढाईत हरत असलेल्या ‘तो’ एकमेकांना मुंबई लोकलच्या प्रवासात भेटतात. त्यांच्या नजरा जुळतात, आणि तेथून सुरू होते एक प्रेमकथा. प्रवासात हिरवा सिग्नल मिळालेलं हे नातं नंतर कोणत्या वळणांवरून जातं याची उत्कंठावर्धक गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

ट्रेलरनेच वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

‘मुंबई लोकल’च्या ट्रेलरमध्ये या नात्याची सुरुवात, गूढता आणि हळुवारपणा दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमधून उलगडत जाणारा कथानकाचा प्रवास आणि संवादांनी निर्माण होणारी भावना प्रेक्षकांना थेट भिडते. अभिनय, लेखन, छायांकन, संगीत अशा सर्वच विभागांमध्ये हा चित्रपट प्रभावी असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होते. म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रभावी कलाकारांची साथ आणि तांत्रिक बाजूंचं भक्कम योगदान

या चित्रपटात मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे हे दमदार कलाकार आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहेत. छायांकन योगेश कोळी यांचे असून, संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे. विनोद शिंदे हे क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि डॉ. सुमित पाटील यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राहुल ठोंबरे यांनी पार पाडली आहे.

संगीत, गीत आणि पार्श्वसंगीत यांचा सुरेल समन्वय

चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांनी लिहिली असून, देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी आणि हर्षवर्धन वावरे यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांनी दिलं असून, त्यातून कथानकाला एक सुस्पष्ट गती लाभली आहे. असोसिएट प्रोड्यूसर म्हणून निकुंज मालपाणी यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं आहे.

प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज ‘मुंबई लोकल’

१ ऑगस्ट रोजी ‘मुंबई लोकल’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. स्थानिक प्रवासातून उलगडणाऱ्या प्रेमकथेचा हा प्रवास प्रेक्षकांना भावेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. त्यामुळे एक वेगळी प्रेमकथा अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन ‘मुंबई लोकल’ची सफर जरूर करावी.

Leave a comment