
‘सन मराठी’वरील ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कथानक सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत विवाह विशेष भाग सुरू आहेत, याचसह राणीची लगीनघाई सुरू असलेली पाहायला मिळते.
प्रोमोतून उलगडली नाट्यमय घटना
राणीच्या लग्नाचे सोहळे म्हणजेच मुहूर्तमेढ, मेहंदी आणि हळदीचे विधी जल्लोषात पार पडत असतानाच एक अनपेक्षित घटना घडते. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हळदीच्या समारंभात नकळत इंद्राची उष्टी हळद राणीला लागते.
हुंड्यामुळे मोडलं लग्न, इंद्राचा धक्कादायक निर्णय
मुख्य विवाह मुहूर्तावर हुंड्याच्या कारणावरून राणीचं लग्न मोडतं आणि तिच्या कुटुंबाला चारचौघात अपमान सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, राणीच्या घरच्यांची इज्जत वाचवण्यासाठी इंद्रा स्वतः राणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. इंद्राच्या या निर्णयामुळे सगळ्यांना धक्का बसतो. अखेर राणी-इंद्राचं लग्न थाटात पार पडतं.
महाडिक कुटुंब करणार राणीचा स्वीकार?
पण इंद्राचा हा निर्णय महाडिक कुटुंबाला मान्य नाही. आता महाडिक कुटुंब राणीचा स्वीकार करतील का? राणी-इंद्राच्या नव्या नात्याची पुढील वाटचाल कशी असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
वैभवी चव्हाणचा नववधू म्हणून अनुभव
मालिकेत राणी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी चव्हाण म्हणाली, “मालिका सुरू झाल्यापासूनच राणी-इंद्रा या जोडीचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. राणीचं लग्न ठरलं तेव्हा प्रेक्षकांचे मेसेज येऊ लागले. पण हुंडा न दिल्यामुळे राणीचं लग्न मोडतं आणि त्याच वेळी इंद्रा राणी बरोबर लग्न करायला तयार होतो. हा प्रोमो पाहून प्रेक्षकवर्ग खूप खुश झाला आहे.”
लग्नाच्या शूटिंगदरम्यान मजामस्ती
“प्रेक्षकांचं प्रेम पाहून काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदा मी नवरी म्हणून बोहोल्यावर चढली आहे. खरंच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सर्व कलाकार आणि पडद्यामागील टीमला भरपूर मेहनत घ्यावी लागते. लग्नाचे भाग शूट होत असताना कामाबरोबर आम्ही सुंदर फोटोशूट करत धमाल, मस्ती केली.”
