
‘बिन लग्नाची गोष्ट’च्या नव्या मोशन पोस्टरने वाढवली उत्सुकता
गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं. याआधी प्रदर्शित झालेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती. त्याची चर्चा अजून थांबली नाही, तोच आता दुसऱ्या पोस्टरमधून निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे लोकप्रिय कलाकार एकत्र दिसले आहेत.
मोशन पोस्टरमध्ये दिसलं एका हटके नात्याचं गुपित
या मोशन पोस्टरमध्ये निवेदिता सराफ सोफ्यावर मुंडावळ्या घालून बसलेल्या दिसतात, पण चेहऱ्यावर नवरीसारखी लाज नाही, तर एक मिश्किल शांतता आहे. त्यांच्या मागे गिरीश ओक खुश चेहऱ्याने हात हलवत काहीतरी सांगत आहेत. हे दृश्य पाहून लगेच लक्षात येतं की हे पारंपरिक नवरा-बायकोसारखं जोडपं नाही, पण त्यांचं नातं मात्र अतिशय घट्ट आहे.
नात्यांच्या नव्या व्याख्या सांगणारी कथा
दिग्दर्शक आदित्य इंगळे सांगतात, “आजच्या तरुण पिढीला नात्यांबाबत प्रामाणिकपणा आणि स्पष्टता असली तरी लग्नाविषयी अजूनही गोंधळ आहे. काही नाती लग्नाच्या चौकटीत न बसता अधिक अर्थपूर्ण असतात. ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही त्याचीच हलकीफुलकी पण अंतर्मुख करणारी मांडणी आहे.”
गंमतीदार मांडणीतून वास्तवाचं प्रतिबिंब
चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य म्हणतात, “आजची तरुणाई नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहते. आम्ही हा दृष्टिकोन चित्रपटात जपताना त्याला हास्याचा आणि हृदयस्पर्शी संवादांचा हलकाफुलका स्पर्श दिला आहे. हे चित्रपट सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांना नक्कीच भावेल.”
चार दमदार कलाकारांची जादू एकत्र अनुभवायला मिळणार
या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक या चारही लोकप्रिय कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रेक्षकांसाठी एक नवं नातं, नवी कहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
