
अमेरिकेतील ‘नाफा फिल्म अवॉर्ड नाईट’चा भव्य सोहळा
‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘नाफा जीवन गौरव पुरस्काराने’ यंदा ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांना गौरवण्यात आले. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड आणि मल्याळम भाषांतील चित्रपटांत त्यांच्या प्रगल्भ अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेल्या पालेकरांचा गौरव अमेरिकेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’, सॅन होजे येथे २५ जुलै रोजी संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते.
‘हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न आता पूर्ण होईल’ – अमोल पालेकर
पुरस्कार स्वीकारताना अमोल पालेकर म्हणाले, “गौरी देशपांडेच्या कथेनुसार मी एक मराठी सिनेमा बनवत होतो, ज्यात निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन यांना घेण्याचा विचार होता. निकोलने पटकथेला होकार दिला होता, मात्र हॉलिवूड स्टुडिओच्या अटीमुळे तो प्रकल्प थांबला. त्या वेळी NAFAसारखी संस्था असती, तर तो सिनेमा पूर्ण झाला असता. आज NAFAच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा आहे.”
‘अमोल पालेकर म्हणजे भारतीय सिनेमा विश्वातील जुबिलीस्टार’ – अभिजीत घोलप

नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप म्हणाले, “पालेकर यांच्या सहजसुंदर अभिनयाने आणि हळुवार प्रेमळ भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या सन्मानाने ‘नाफा’चा गौरव वाढला आहे.”
अमोल पालेकर – अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रकलेतील त्रिवेणी संगम
पालेकर यांनी ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. सुरुवातीला चित्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी रंगभूमी आणि सिनेमात प्रवेश केला. ‘शांतता! कोर्ट चालू आहे’, ‘गोलमाल’, ‘छोटी सी बात’, ‘बातों बातों में’, ‘रजनीगंधा’, ‘धूसर’, ‘पहेली’, ‘अनाहत’, ‘ध्यासपर्व’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही आठवणीत राहतात.
रेड कार्पेटवर झळकले मराठी सिनेविश्वातील तारे
स्वप्नील जोशीने नव्या लूकमध्ये केलेली रेड कार्पेट एंट्री विशेष लक्षवेधी ठरली. त्यानंतर वैदेही परशुरामी, आदिनाथ कोठारे, अमोल पालेकर व संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी (मुलीसह), अश्विनी भावे, सचिन खेडेकर, गजेंद्र अहिरे, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे आणि मधुर भांडारकर यांच्यासह सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती दिसून आली.
गौरव, नृत्य आणि ‘बाई बाई मनमोराचा’ची धुन
या रंगतदार सोहळ्यात मराठी लोकनृत्य सादर झाले. त्यानंतर कलाकारांना सन्मानचिन्हे देण्यात आली. अवधूत गुप्ते यांना ‘बाई बाई मनमोराचा’ आणि ‘आयुष्य हे’ या गाण्यांची विशेष फर्माइश करण्यात आली, ज्यावर प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
