
पारंपरिक ओटीटीला झटका, आमिर खानची यूट्यूबवर अनोखी वाटचाल
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने आपली बहुचर्चित फिल्म ‘सितारे जमीन पर’ ओटीटीवर न आणता थेट यूट्यूबवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ ₹१०० मध्ये घरबसल्या ही फिल्म प्रेक्षकांना पाहता येणार असून, यूट्यूबवरील ‘Aamir Khan Talkies’ या चॅनलवर ती उपलब्ध होणार आहे.
‘Aamir Khan Talkies’ – एक डिजिटल सिनेमाघर
मार्च २०२५ मध्ये सुरू झालेल्या आमिरच्या या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स मिळाले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आमिरने या नव्या प्रयोगाची घोषणा केली. “या योजनेमुळेच मी ‘सितारे जमीन पर’चे डिजिटल हक्क ओटीटीला दिले नाहीत,” असं स्पष्ट करत त्याने सर्व चित्रपट याच मॉडेलखाली यूट्यूबवर आणण्याचं जाहीर केलं.
‘लगान’ ते ‘तारे जमीन पर’ – सगळे चित्रपट आता ऑनलाईन

आमिर खान प्रॉडक्शनच्या प्रत्येक चित्रपटाचा यूट्यूबवर १०० रुपयांत Pay-per-view अनुभव घेता येईल. ‘लगान’, ‘तारे जमीन पर’, ‘पीपली लाईव्ह’, ‘दंगल’, ‘जाने तू या जाने ना’ यासारखे अनेक चित्रपट या योजनेत क्रमशः समाविष्ट होतील. शिवाय, आमिरचे वडील ताहिर हुसैन यांच्याशी संबंधित ‘कारवाँ’ (१९७१), ‘हम हैं राही प्यार के’ (१९९३) यांसारखे चित्रपटही याच चॅनलवर पाहता येणार आहेत.
तरुण निर्मात्यांसाठी नवी संधी
या चॅनलचा दुसरा हेतू म्हणजे नवोदित आणि स्वबळावर चित्रपट करणाऱ्या तरुण दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. “थिएटरमध्ये जागा न मिळालेल्या दर्जेदार चित्रपटांना यूट्यूबवर प्रसिद्धी देण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे आमिरने स्पष्ट केले. निर्मात्यांकडून केवळ नाममात्र शुल्क घेण्यात येईल आणि बाकीचा नफा त्यांच्या खात्यात जाईल.
पे-पर-व्यू मॉडेल म्हणजे ओटीटी पेक्षा वेगळा अनुभव
“सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये प्रेक्षक माझा चित्रपट विकत घेत नाही, तर पूर्ण प्लॅटफॉर्मच विकत घेतो. पण पे-पर-व्यू मॉडेल म्हणजे माझा चित्रपट प्रेक्षक स्वतःहून निवडतो – जसा थिएटरमध्ये करतो. हे मॉडेलच प्रेक्षक-सर्जक यांच्यातला खरा दुवा निर्माण करतं,” असं सांगत आमिरने ओटीटीपेक्षा या नव्या वाटेचं समर्थन केलं.
प्रेक्षकांची एक पाऊल पुढे टाकण्याची अपेक्षा
“एक कलाकार म्हणून मी माझ्या प्रेक्षकांसाठी हजार पावलं टाकायला तयार आहे, पण माझ्या प्रेक्षकांनी फक्त एक पाऊल माझ्यासाठी टाकावं,” अशा शब्दांत आमिरने प्रेक्षकांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं.
चित्रपटसृष्टीसाठी नवा डिजिटल टर्निंग पॉइंट
आमिर खानचा हा निर्णय केवळ एक व्यावसायिक निर्णय नाही, तर संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी डिजिटल वळणाचा नवा अध्याय ठरू शकतो. Pay-per-view चा हा मॉडेल मोठ्या निर्मात्यांसोबतच छोट्या सर्जकांनाही नव्या संधी उपलब्ध करून देणार आहे.
