
श्री महावतार बाबाजींची महती सांगणारा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
साधूसंतांनी नेहमीच सर्वसामान्यांना मार्ग दाखवत सुखी जीवनाचा मंत्र दिला आहे. असेच एक युगपुरुष, एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. हिमालयाच्या पावन धरतीवर सतत संचार करणाऱ्या श्री महावतार बाबाजी यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरली आहे. हा योग म्हणजेच क्रियायोग. बाबाजींनी सांगितलेल्या क्रियायोगाच्या सहाय्याने मानव आपल्या अध्यात्मिक उत्क्रांतीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू शकतो.
रहस्यमय हिमालयीन योग्याची भेट ‘फकिरीयत’ चित्रपटात
योगाचे प्रणेते श्री महावतार बाबाजी यांची शिकवण आणि त्यांच्या शिष्याची संघर्षमय कहाणी उलगडणारा ‘फकिरीयत’ हा हिंदी चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात बाबाजींच्या कार्याची, शिकवणीची आणि अध्यात्मिक अनुभवांची झलक पाहायला मिळते. टिझरमधून महाकाली आणि महादेवांचे दर्शनही होते.
चित्रपट निर्मिती आणि कलात्मक बाजू
‘फकिरीयत’ चित्रपटाची निर्मिती भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपी अंतर्गत करण्यात आली आहे. आजवर अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिग्दर्शित करणारे संतोष मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा अनुजा जानवलेकर यांच्या ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या पुस्तकांवर आधारित आहे. पटकथा अनिल पवार यांनी लिहिली असून संवादलेखनही त्यांनीच अनुजा जानवलेकर यांच्यासोबत केले आहे.
गुरु आणि शिष्याच्या नात्याची आध्यात्मिक कथा
‘फकिरीयत’ फक्त बाबाजींच्या शिकवणीवर आधारित नाही तर त्यांच्या शिष्याच्या संघर्षांची आणि सनातन धर्माच्या प्रसारातील अडथळ्यांचीही गोष्ट सांगतो. बाबाजी या शिष्याला मार्गदर्शन देतात, शक्ती देतात आणि अशा आध्यात्मिक अवलियांची महती मोठ्या पडद्यावर पोहोचवतात. ‘गुरु और शिष्य की कहानी’ ही टॅगलाईन चित्रपटाच्या आशयाशी पूर्णपणे सुसंगत आहे.
दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांचे मत
टिझरबाबत बोलताना संतोष मांजरेकर म्हणाले, “‘फकिरीयत’चा टिझर हा प्रेक्षकांना चित्रपटात काय असणार आहे याची अचूक झलक देतो. हे चित्रपट केवळ एक अध्यात्मिक प्रवास नाही तर ते जगाच्या हितासाठी स्वतः झिजून इतरांना प्रकाश देणाऱ्या बाबाजींसारख्या अवलियांच्या विचारांची मांडणी करणारा आहे. हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.”
दीपा परबचं हिंदीत पुनरागमन, संतोष जुवेकर पाहुण्या भूमिकेत
या चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठमोळ्या दीपा परब यांनी हिंदीत पुनरागमन केलं आहे. त्यांच्यासोबत उदय टिकेकर, संदेश जाधव, विनीत शर्मा, अक्षय वर्तक, नयन जाधव, अनिशा सबनीस यांच्यासह संतोष जुवेकरही पाहुण्या भूमिकेत झळकणार आहे.
संगीत, गीत आणि तांत्रिक बाजू
चित्रपटाचं छायाचित्रण अजित रेड्डी यांनी, संकलन निलेश गावंड यांनी केलं आहे. गीतकार समृद्धी पवार यांच्या रचनांना संगीतकार प्रवीण कुंवर यांनी संगीत दिलं आहे. गायनात मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी, नेहा राजपाल यांचा सहभाग आहे.
प्रेक्षकांच्या मनात आध्यात्मिक जाणीवा जागवणारा प्रयत्न
‘फकिरीयत’ हा चित्रपट फक्त धार्मिक श्रद्धेचा भाग नसून, बाबाजींच्या अध्यात्मिक शिकवणींना प्रेक्षकांच्या मनात जागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या टिझरमुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि १९ सप्टेंबर रोजी ‘फकिरीयत’च्या रूपाने एक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी प्रवास सर्वांच्या समोर येणार आहे.
