‘आम्ही सारे खवय्ये – जोडीचा मामला’ स्वयंपाकाच्या दुनियेत पुन्हा एक खास सफर

झी मराठीवरील लोकप्रिय कुकरी शो ‘आम्ही सारे खवय्ये’ पुन्हा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यावेळी ‘जोडीचा मामला’ या नव्या थीमनं सजलेलं हे पर्व खास सेलिब्रिटी जोड्यांना केंद्रस्थानी ठेवून सादर होणार आहे. स्वयंपाक, आठवणी, प्रेम आणि मराठी खाद्यसंस्कृतीचा संगम असलेल्या या नव्या पर्वात, प्रत्येक भागात एक नवी जोडी त्यांच्या खास पाककृती, त्यांच्या नात्याचे क्षण आणि त्यामागच्या गोड आठवणी शेअर करणार आहे.

प्रत्येक जोडीची खास रेसिपी आणि त्यांच्या नात्याचा गोड सुगंध

या पर्वात पाहायला मिळतील कधी लग्नानंतरचं पहिलं जेवण, कधी मिसळच्या ताटाभोवती रंगलेली प्रेमकहाणी, तर कधी घरच्या परंपरेनं दिलेली खास चव. दोघं मिळून स्वयंपाक करताना होणाऱ्या मिश्किल गप्पा, प्रेमाने भरलेले हळवे क्षण आणि त्या क्षणांना जोडणाऱ्या पाककृती प्रेक्षकांना नक्कीच भावतील.

मराठी चविंचा, परंपरांचा आणि प्रादेशिक पाककृतींचा स्वाद

या पर्वात प्रत्येक जोडी त्यांच्या प्रादेशिक पार्श्वभूमीला साजेशी एखादी खास रेसिपी सादर करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांतल्या खाद्यपरंपरांचं अनोखं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. ह्या चविष्ट प्रवासात रसिक प्रेक्षकांना जेवणापेक्षा जास्त – एक सच्चं नातं, आठवणी आणि आपल्या मातीची ओळख मिळणार आहे.

सूत्रसंचालनाची जबाबदारी पुन्हा संकर्षण कऱ्हाडेकडे

या पर्वाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा संकर्षण कऱ्हाडे करत असून, त्याच्या शब्दात, “स्वयंपाकघर म्हणजे केवळ अन्न शिजवायचं ठिकाण नसून, ती दोन माणसांमधली जवळीक घडवणारी जागा आहे. हे पर्व म्हणजे त्या नात्यांचा गोड सुगंध आहे. आठवणी, प्रेम आणि चव यांचा सुंदर संगम आहे.”

९ ऑगस्टपासून दर शनि-रवि, दुपारी १ वाजता फक्त झी मराठीवर

‘आम्ही सारे खवय्ये – जोडीचा मामला’ हे खास पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ९ ऑगस्टपासून, प्रत्येक शनिवार आणि रविवार दुपारी १ वाजता, केवळ झी मराठीवर. सेलिब्रिटी जोड्यांच्या खास रेसिपीज, मजेशीर किस्से आणि चविष्ट मराठीपण अनुभवायला विसरू नका!

Leave a comment