
गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच सर्वत्र मंगलमय वातावरण तयार झालं आहे. अशा भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात ‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांसाठी एक खास उपक्रम घेऊन येत आहे — ‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’. या विशेष कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची सुरेल भक्तिमय मैफिल. प्रेक्षकांना त्यांची गाणी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे.
अभंग रिपोस्ट बँडची ऊर्जा आणि नवतेचा संगम
या कार्यक्रमात अभंग संगीताला नव्या धाटणीने मांडणारा, आणि तरुण पिढीमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेला ‘अभंग रिपोस्ट’ बँडसुद्धा सहभागी होणार आहे. पारंपरिक अभंगांना आधुनिक वाद्यांच्या साथीने सादर करणाऱ्या या बँडमुळे कार्यक्रमाला एक वेगळा उत्साह आणि रंगत लाभणार आहे.
५ ऑगस्टला मीरा रोडमध्ये होणार आयोजन
५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह, महाजन वाडी, मीरा रोड येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. यंदाचा गणेशोत्सव ‘सन मराठी’ कुटुंबासाठी एकत्र येण्याचा, एकत्र साजरा करण्याचा सोहळा ठरणार आहे.
कलाकारांचा जल्लोष, नृत्य-गाण्याची बहार
‘सन मराठी’वरील सर्व लोकप्रिय मालिकांमधील कलाकार या मंचावर एकत्र येऊन प्रेक्षकांसमोर आपली खास कला सादर करणार आहेत. त्यांच्या सादरीकरणातून भक्तीभावासोबतच मनोरंजनाचीही मेजवानी मिळणार आहे. नृत्य, नाट्य, गाणं आणि धमाल गेम्स यामुळे कार्यक्रमात रंगत आणखी वाढणार आहे.
प्रवेश विनामूल्य, जागा मर्यादित
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. मात्र जागा मर्यादित असल्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. बातमी किंवा त्यासंदर्भातील फोटो पास म्हणून दाखवून प्रवेश मिळवता येणार आहे.
गणेशभक्ती, कला आणि करमणुकीचा एकत्र अनुभव
‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’ हा कार्यक्रम म्हणजे भक्ती, कलात्मकता आणि करमणूक यांचा एकत्रित उत्सव आहे. चला तर मग, बाप्पाचं स्वागत जल्लोषात करूया आणि या खास कार्यक्रमात सामील होऊन त्याचा आनंद लुटूया!
