
१९ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी ‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च झाले असून, येत्या १९ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
रिक्षा चालकाच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित कथा
‘टँगो मल्हार’ची निर्मिती ॲगलेट्स अँड आयलेट्स प्रॉडक्शन अंतर्गत करण्यात आली असून साया दाते या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. या चित्रपटात एका रिक्षा चालक मल्हारची गोष्ट उलगडली जाते. काहीतरी नवीन करण्याची इच्छा बाळगणाऱ्या मल्हारला योगायोगाने अर्जेंटिनाच्या ‘टँगो’ या नृत्य प्रकाराचा शोध लागतो आणि त्याची आवड निर्माण होते. या नृत्यामुळे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या रंजक घटना या चित्रपटाचा मुख्य गाभा आहेत.
तांत्रिक टीम आणि कलाकारांची नवी फळी

चित्रपटाचं लेखन साया दाते आणि मनीष धर्मानी यांनी केलं आहे. सुमेध तरडे आणि ओंकार आठवले यांचं छायांकन, क्षमा पाडळकर यांचं संकलन, तुषार कांगारकर यांचं ध्वनी आरेखन, तसेच शार्दूल बापट आणि उदयन कानडे यांचं संगीत व पार्श्वसंगीत यातून ‘टँगो मल्हार’ला तांत्रिक बळ मिळालं आहे. या चित्रपटात नितेश कांबळे, कीर्ति विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड, मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी आणि पंकज सोनावणे यांसारख्या नवोदित कलाकारांची भूमिका आहे.
साया दाते – तंत्रज्ञानापासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास
साया दाते यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी) येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत ‘युट्यूब’मध्ये काम करत त्यांनी दहा वर्षे तंत्रज्ञान क्षेत्रात अनुभव मिळवला. भारतात परतल्यावर त्यांनी पुण्यात स्वतःची कंपनी सुरू केली. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना फोर्ब्जच्या ‘३० अंडर ३०’ यादीत स्थान मिळाले होते.
बालपणापासूनची कला आणि टँगोची आवड
वयाच्या १२व्या वर्षीच साया यांनी ‘ऑन द अदर लाइन’ ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली होती, जी अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गौरवली गेली. त्या स्वतः एक प्रशिक्षित टँगो डान्सरही आहेत. तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीसोबतच कलेची आवड जोपासण्यासाठी त्यांनी ‘टँगो मल्हार’द्वारे चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे. त्यामुळे एका संगणक शास्त्रज्ञ आणि उद्योजिकेच्या या चित्रपट प्रवासाकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.
