तेजश्री ताईसोबत पहिला सीन – राज मोरेचा अनुभव

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता राज मोरे आता ‘वीण दोघातली ही तुटेना’ या नवीन मालिकेतून रोहन सरपोतदार या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पहिल्यांदाच मध्यमवर्गीय मुलाचा अभिनय करताना त्याने आपल्या पात्राबद्दल आणि सेटवरील अनुभवांबद्दल खास आठवणी शेअर केल्या.

भूमिकेची कथा आणि संघर्ष

राज सांगतो, “रोहन हा शांत, मेहनती आणि स्वप्नाळू मुलगा आहे. त्याचं स्वप्न आहे की आपल्या स्वानंदी ताईचं लग्न करावं, मात्र त्यासाठी त्याला स्वतःचं काहीतरी घडवायचं आहे. अधिराच्या भावाला, म्हणजेच समर राजवाडेला, स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आणि त्याची मान्यता मिळवायची – हाच त्याचा संघर्ष आहे.”

नवीन मालिकेत संधी कशी मिळाली

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका संपल्यानंतर राज विविध भूमिकांसाठी ऑडिशन्स देत होता. त्याच दरम्यान या मालिकेबद्दल कळलं. “मॉकशूट आणि वाचन झाल्यानंतर मला मेसेज आला की आपण हा शो करत आहोत. प्रोमो टीव्हीवर आल्यानंतर तर एकदम भारी वाटलं. माझ्या आईला भरून आलं कारण शाळेत असल्यापासून झी मराठी पाहत आलोय आणि त्या चॅनेलवर माझा प्रोमो दिसणं ही मोठी गोष्ट आहे,” असं तो सांगतो.

तेजश्री प्रधानसोबत पहिला सीन

शूटिंगच्या पहिल्याच दिवशीचा किस्सा सांगताना राज म्हणतो, “माझा आणि तेजश्री ताईचा पहिला सीन होता. मला प्रचंड दडपण आलं आणि मी तिलाही सांगितलं. ती म्हणाली, मीही एकेकाळी सीनियर कलाकारांसोबत पहिल्यांदा काम करताना असंच वाटलं होतं आणि ते साहजिक आहे. तिने मला इतकं कंफर्टेबल केलं की त्यानंतर आमचं नातं खूप छान फुललं. हेच भावा-बहिणीचं नातं प्रेक्षकांना ऑनस्क्रीन पाहायला मिळेल.”

सहकलाकारांशी जुळलेले नाते

राजची किशोर महाबोले (वडिलांची भूमिका) यांच्याशी छान मैत्री झाली आहे. तसेच सुलभा आर्या यांच्यासोबतची पहिली भेटही खास होती. “पहिल्याच दिवशी मी मॅमकडे जाऊन सांगितलं की मला तुमच्या शूटच्या आणि शाहरुख खानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत,” तो हसत सांगतो.

जुन्या झी मराठी मालिकांची आठवण

राजच्या मते, ही मालिका प्रेक्षकांना जुन्या झी मराठी मालिकांची आठवण करून देईल. त्यामुळे तो आग्रहाने म्हणतो, “सोमवार ते शनिवार, संध्याकाळी ७:३० वाजता ‘वीण दोघातली ही तुटेना’ पाहायलाच हवी.”

Leave a comment