‘समर्थयोगी’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न

१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता वसई येथील भुईगावातील स्वामी समर्थ मठात स्वयंभू प्रॉडक्शन निर्मित ‘समर्थयोगी’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. या सोहळ्याला मठाचे अधिपती श्री संदीप म्हात्रे, नितीन परुळेकर आणि अनंत नाईक यांच्या शुभहस्ते मुहूर्त क्लॅप देण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आणि स्वामी समर्थ तसेच रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद कायम लाभोत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

निर्मिती व दिग्दर्शनाची टीम

या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन चंद्रशेखर छबूबाई व्यंकटराव सांडवे यांनी केली असून, क्रिएटिव्ह दिग्दर्शनाची धुरा सुनील खेडेकर यांच्यावर आहे. प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून तन्मय सांडवे आणि सर्वेश सांडवे कार्यरत आहेत. सहनिर्मात्यांमध्ये प्रकाश राणे आणि विवेक पर्वते यांचा समावेश आहे. कथा प्रकाश राणे यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद कय्युम काझी यांनी दिले आहेत.

तांत्रिक चमू आणि कलावंत

सिनेमॅटोग्राफी रितेश पाटील यांची असून संकलन विघ्नेश वाळुंज यांचे आहे. लाईन प्रोड्युसर म्हणून सुधीर सोमवंशी काम पाहत आहेत. या चित्रपटात नामवंत कलाकारांचा सहभाग असून स्वामी समर्थांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक कुलकर्णी झळकणार आहेत.

शूटिंगचे वेळापत्रक

चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलमधील दोन दिवसांचे शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले असून पुढील शेड्युल सप्टेंबर महिन्यात पार पडणार आहे. या चित्रपटाची कथा अध्यात्म, श्रद्धा आणि समाजाला दिशा देणाऱ्या विचारांवर आधारित असून मराठी प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी भेट ठरणार आहे.

Leave a comment