‘घरत गणपती’ पुन्हा चित्रपटगृहात झळकणार

लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात प्रेक्षकांना स्मरणरंजनाची मेजवानी देण्यासाठी हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव २९ ऑगस्टपासून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. कौटुंबिक कथानक आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा चित्रपट एकदा पाहिल्यावर पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा ठरला होता.

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा आनंद

चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर म्हणाले, “अनेकदा प्रेक्षक ‘घरत गणपती’ मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळणार असा प्रश्न विचारत होते. गणरायाच्या कृपेने त्यांची ही इच्छा पूर्ण करता येतेय याचा आम्हाला खूप आनंद आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची वेगळी मजा आहे.” त्यांनी सांगितलं की, कौटुंबिक नात्यांची हळवी गोष्ट आणि संस्कृतीचं दर्शन दाखवणाऱ्या या चित्रपटाला आजही विविध स्तरावर भरभरून कौतुक मिळत आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल निर्मात्यांचे आभार

पॅनोरमा स्टुडिओजचे सीईओ (डिस्ट्रीब्युशन आणि सिंडिकेशन) मुरलीधर छतवानी म्हणाले, “चित्रपटाच्या टीमने खूप मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला. प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्ही सर्वप्रथम प्रेक्षकांचे आभार मानतो.”

निर्मिती आणि दिग्दर्शन टीम

पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या विद्यमाने साकारलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी केले आहे. निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर आणि गौरी कालेलकर-चौधरी यांनी केली आहे.

अभिनयाची ताकदवान फळी

निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर आणि दिव्यलक्ष्मी मैस्नाम आदी कलाकारांच्या दमदार अभिनयाने ‘घरत गणपती’ला वेगळीच रंगत प्राप्त झाली. लेखन-दिग्दर्शन, संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत या सर्व घटकांमुळे प्रेक्षक अक्षरश: या चित्रपटावर फिदा झाले होते.

गणेशोत्सवात खास भेट

२९ ऑगस्टपासून पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणारा ‘घरत गणपती’ गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणार आहे. नात्यांचे बंध जपत आणि उत्सवाच्या आनंदात भर घालत हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र आणणार आहे.

Leave a comment