‘फकिरीयत’चा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

निष्ठावान शिष्या आणि सक्षम गुरुची गोष्ट सांगणाऱ्या ‘फकिरीयत’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अभिनेत्री-निर्मात्या मेधा मांजरेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कलाकार-तंत्रज्ञ आणि मान्यवरांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

चित्रपटाची कथा आणि आध्यात्मिक आधार

‘फकिरीयत’ हा चित्रपट गुरूमाई माँ रुद्रात्मिका यांच्या आध्यात्मिक प्रवासावर आधारित आहे. महावतार बाबाजींच्या आदेशानुसार २०२४ मध्ये या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. या चित्रपटात महावतार बाबाजींसह श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी समर्थ, शंकर महाराज, बाबा श्री कालभैरव, बाबा श्री भद्रबाहू, हेडाखान बाबा आणि माँ काली यांचे दर्शन घडणार आहे. क्रियायोग, मुद्रायोग, प्राणायाम आणि गुरु-शिष्य परंपरेची महती या चित्रपटाच्या कथेतून प्रकट होणार आहे.

निर्मिती आणि दिग्दर्शन टीम

भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी संतोष मांजरेकर यांनी सांभाळली असून, या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर लिखित पुस्तकांवर कथा आधारित आहे. पटकथा अनिल पवार यांनी लिहिली असून संवाद अनुजा जानवलेकर आणि अनिल पवार यांनी एकत्रित लिहिले आहेत.

कलाकार आणि व्यक्तिरेखा

या चित्रपटात दीपा परब यांनी गुरूमाता साकारली आहे, तर इतर प्रमुख भूमिकांमध्ये उदय टिकेकर, संदेश जाधव, विनीत शर्मा, अक्षय वर्तक, नयन जाधव, अनीषा सबनीस आदींचा समावेश आहे. अभिनेता संतोष जुवेकर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे. दीपा परब यांनी साकारलेली भूमिका क्रियायोग आणि प्राणायामाबाबत जनजागृती करणारी आहे.

संगीत आणि तांत्रिक बाजू

संगीतकार प्रवीण कुंवर यांच्या सुरेल धूनांना गीतकार समृद्धी पवार यांच्या शब्दांची जोड मिळाली आहे. मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी आणि नेहा राजपाल यांनी गायलेली गीते प्रेक्षकांना भावस्पर्शी ठरणार आहेत. संकलन निलेश गावंड यांनी केले असून, छायाचित्रण अजित रेड्डी यांनी केले आहे.

चित्रीकरण आणि विशेष ठिकाणं

‘फकिरीयत’चे काही चित्रीकरण काशी मणिकर्णिका आणि उत्तराखंड येथे करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या काळात मणिकर्णिकावर चित्रीकरण करणे आव्हानात्मक होते, परंतु बाबाजींच्या कृपेने ते शक्य झाले. उत्तराखंडमधील दुर्गम स्थळांवरही चित्रीकरण झाले असून, तेथील निसर्गसौंदर्य चित्रपटात आकर्षण ठरणार आहे.

प्रदर्शनाची तारीख

‘फकिरीयत’ हा आध्यात्मिकता, भक्तीभाव आणि त्यागाची महती सांगणारा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे क्रियायोगाचा दैवी संदेश आणि गुरु-शिष्य परंपरेची ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

Leave a comment