
मुंबईतील ऐतिहासिक ‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवाला यंदा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची मेजवानी लाभणार आहे. संस्थेची स्थापना १० डिसेंबर १९१६ रोजी झाली असून, पहिला श्री गणेशोत्सव १९२६ मध्ये पार पडला. गेल्या शंभर वर्षांत मंडळाने विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमधून परंपरा जपली आहे. यंदा हा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ची जादू

२९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वाजता ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ हा काव्यमय नाट्यप्रयोग सादर होणार आहे. पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्या कविताप्रेमातून जन्मलेला हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांना एक वेगळं विश्व दाखवणार आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे आपल्या प्रभावी अभिनयातून हा अनुभव अधिक गहिरा करणार असून त्यांना अमित वझे, मानसी वझे, निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य आणि अंजली मराठे यांची साथ लाभणार आहे. कथा, संगीत आणि भावनांचा संगम असलेला हा प्रयोग प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देणार आहे.
‘संकर्षण via स्पृहा’चे विशेष आकर्षण

लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता ‘संकर्षण via स्पृहा’ या मराठी साहित्य-मनोरंजन कार्यक्रमातून रसिकांसमोर येणार आहेत. कवितांपासून गाणी, किस्से आणि खास गप्पांचा हा अनोखा प्रवास रसिकांसाठी आगळावेगळा ठरणार आहे. या कार्यक्रमात विनय चौलकऱे आणि गांधीर जोग यांचीही साथ असणार आहे.
इतर बहारदार कार्यक्रमांची रेलचेल
शतकमहोत्सवी गणेशोत्सवात ३० ऑगस्टला ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’ या विशेष कार्यक्रमात मा. ले. ज. विनायक पाटणकर (नि.) आणि मा. ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.) सहभागी होणार आहेत, तर पत्रकार उदय निरगुडकर त्यांचे मुलाखतकार असतील. ३१ ऑगस्टला ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’ प्रद्योत पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून मुलाखतकार सर्वेश देशपांडे असतील.
३ सप्टेंबर रोजी पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘हसले मनी चांदणे’ हा त्यांच्या सुमधुर गीतांवर आधारित कार्यक्रम सादर होईल. ५ सप्टेंबरला वारकरी कीर्तनाचा कार्यक्रम ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील घेणार आहेत.
प्रवेश विनामूल्य, परंपरेचा आनंद द्विगुणित
हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, काही रांगा आरक्षित असतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाणार आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी देणारा *‘ब्राह्मण सेवा मंडळा’*चा शतकमहोत्सवी गणेशोत्सव गणेशभक्तांसाठी संस्मरणीय ठरणार आहे.
