
आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्रमैत्रिणी भेटत असतात. त्यापैकी काही जण आजन्म मैत्री टिकवून ठेवतात, तर काही नातेसंबंध अर्धवट तुटून जातात. अशा खरीखुरी मैत्रीची कहाणी सांगणारा तारा करमणूक निर्मित, प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ हा नवीन मराठी चित्रपट नववर्षारंभी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे दमदार पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून त्याने रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्सचा मसाला
‘जब्राट’ हा एक संगीतमय मनोरंजनपट असून त्यात लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्सचा जबरदस्त मसाला आहे. या चित्रपटात तरुणाईसोबत अनुभवसंपन्न कलाकारांचा सुंदर संगम दिसणार आहे. आयुष संजीव, अनुष्का सरकटे, वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट, प्रगती कोळगे ही तरुण मंडळी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्यांना साथ देण्यासाठी ज्येष्ठ कलाकार संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव यांचाही प्रभावी सहभाग आहे.
निर्मिती आणि तांत्रिक बाजू
‘जब्राट’चे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे असून छायांकन अनिकेत खंडागळे यांनी केले आहे. सहाय्यक असोशीएट म्हणून चार्लेस गोम्स कार्यरत आहेत. ‘लावणी किंग’ म्हणून ओळखले जाणारे आशिष पाटील यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वेशभूषा युगेशा ओमकार यांनी केली असून प्रत्येक फ्रेम अधिक रंगतदार करण्यावर भर दिला आहे.
संगीत आणि गायकांचा मेळावा
या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन डॉ. जयभीम शिंदे यांनी केले आहे. प्रेमगीते, प्रेरणादायी गीते आणि लोकगीते अशा विविधतेने सजलेल्या या चित्रपटात पार्श्वगायनाचा समृद्ध मेळ दिसून येतो. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमाप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर आणि स्वाती शिंदे या दिग्गज गायक-गायिकांनी आपल्या आवाजाची जादू पेरली आहे.
उत्सुकतेचा शिगेला पोहोचलेला प्रवास
नववर्षारंभी प्रदर्शित होणारा ‘जब्राट’ हा चित्रपट मैत्री, प्रेम, संगीत आणि नृत्य यांच्या मेळाव्याने सजलेला असल्यामुळे प्रेक्षकांसाठी हा खऱ्या अर्थाने मनोरंजनाचा सोहळा ठरणार आहे. दमदार स्टारकास्ट, रंगतदार संगीत आणि तरुणाईसाठी प्रेरणादायी कथानक यामुळे ‘जब्राट’कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
