
मातृभाषेतून होणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी शाळांची घटती संख्या या गंभीर विषयावर दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी निर्माती क्षिती जोग आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे उपस्थित होते.
आदिती तटकरे यांचे मत
या प्रसंगी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “आपल्या आयुष्यात शाळेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. मातृभाषेतून होणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या संस्कारांवर व जीवनदृष्टीवर मोठा प्रभाव पाडते. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट समाजाला योग्य संदेश देईल आणि तो विचार करायला लावणारा ठरेल. रायगड जिल्ह्यात या चित्रपटाचा मुहूर्त झाला याचा मला विशेष अभिमान आहे. हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांची समाजमनाला भिडणारी कलाकृती निर्माण करण्याची परंपरा कायम आहे, त्यांचा हा नवीन प्रयत्नही प्रेक्षकांच्या मनात घर करेल, असा विश्वास आहे.”
हेमंत ढोमे यांचं मनोगत

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “आज मी जे काही आहे, ते माझ्या मराठी शाळेमुळेच आहे. मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. शाळेतील दिवसांमध्ये जे काही शिकता आलं, त्यानेच माझ्या आयुष्याची दिशा ठरवली. पण आजच्या काळात मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत, हे पाहून मनाला वेदना होतात. आपल्या मुलांनी मातृभाषेतून शिकू नये ही एक चुकीची मानसिकता तयार झाली आहे, जी समाजासाठी धोकादायक ठरू शकते. या चित्रपटातून मी हे अधोरेखित करू इच्छितो की मातृभाषेतून शिकणं ही कधीच कमीपणाची गोष्ट नसून ती मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करणारी बाब आहे. मराठी शाळा ही आपली मुळे आहेत, आणि हाच संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. मुहूर्ताला मा. आदिती तटकरे यांसारख्या समाजभान असलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळणं ही माझ्यासाठी मोठा सन्मानाचा क्षण आहे.”
निर्मिती आणि पुढील प्रवास
क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. या चित्रपटात कोणते कलाकार झळकतील याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र चित्रपटाचा आशय लक्षात घेता तो समाजाला विचार करायला लावणारा आणि मातृभाषेच्या जडणघडणीची नवी जाणीव करून देणारा ठरेल, अशी अपेक्षा आहे.
