
महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागरण गोंधळाला विशेष स्थान आहे. श्रद्धा, भक्ती आणि प्रथेनं जपल्या जाणाऱ्या या परंपरेला आता सिनेमॅटिक रुप मिळालं आहे. ‘आरपार’ या चर्चेत असलेल्या चित्रपटातील ‘जागरण गोंधळ’ हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
ललित प्रभाकरचा हटके लूक आणि जबरदस्त एनर्जी

या गाण्यात ललित प्रभाकरचा एक वेगळाच लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. देवीसमोर तुटलेल्या मनाने जागरण गोंधळ मांडताना त्याची एनर्जी वाखाणण्याजोगी भासत आहे. गाण्यात ललित आणि ऋता दुर्गुळे यांच्या व्यक्तिरेखांमधील ब्रेकअपची वेदना अधोरेखित केली आहे. ती दूर गेल्यानंतर तिच्या आठवणींनी छळलेला नायक देवीकडे आर्तपणे धावा करताना दिसतो.
गाण्याची शब्दरचना आणि संगीताची ताकद
लोककला अभ्यासक गणेश चंदनशिवे यांनी या गाण्याला आवाज दिला असून बोलही त्यांनीच लिहिले आहेत. संगीतकार गुलराज सिंग यांनी गाण्याला दमदार संगीत दिलं आहे. जागरण गोंधळ म्हटलं की संबळाची साथ अपेक्षित असते आणि ही साथ विकास कोकाटे यांनी उत्तमरीत्या साकारली आहे. त्यामुळे गाणं अधिक प्रभावी ठरतं.
निर्मिती आणि दिग्दर्शन टीम
‘लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन्स एलएलपी’ प्रस्तुत हा चित्रपट नामदेव. नि. काटकर आणि रितेश. मो. चौधरी यांनी निर्मित केला आहे. दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद या सर्व जबाबदाऱ्या गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत.
प्रेक्षकांसाठी रोमँटिक अनुभव
प्रेमाची नवी परिभाषा मांडणाऱ्या ‘आरपार’मध्ये ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर ही ताजी जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या रोमँटिक सिनेमाचे प्रदर्शन १२ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वत्र होणार असून, ‘जागरण गोंधळ’ गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
