
मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक कथांना नेहमीच प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. अगदी तशीच रुचकर मेजवानी घेऊन ‘वडापाव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या धमाल टीझरवरून हा सिनेमा एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असल्याचं स्पष्ट होतंय.
प्रसाद ओक यांच्या अभिनयाची शतकपूर्ती
हा चित्रपट विशेष ठरण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीतील हा शंभरावा चित्रपट आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका त्यांनी पहिल्यांदाच या चित्रपटात निभावली आहे. त्यामुळे हा प्रवास त्यांच्यासाठी अधिकच संस्मरणीय ठरणार आहे.
टीझरने वाढवली उत्सुकता
टीझर अत्यंत सुटसुटीत असून त्यात धमाल मनोरंजनासोबतच कौटुंबिक मूल्यांचा सुंदर संगम दाखवण्यात आला आहे. चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
निर्मिती आणि तांत्रिक टीम
एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट व मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल असून छायालेखन संजय मेमाणे यांनी केले आहे. कथा-संवाद सिद्धार्थ साळवी यांनी लिहिले आहेत.
दिग्दर्शक प्रसाद ओक यांचे मनोगत
दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, “‘वडापाव’ ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. कुटुंब, नात्यांतील गोडवा-तिखटपणा आणि त्यातून मिळणारे भावनिक व विनोदी अनुभव यांचा हा मिलाफ प्रेक्षकांना नक्की भावेल.”
निर्मात्यांचे अनुभव आणि अपेक्षा
निर्माते अमेय खोपकर म्हणाले, “मराठी प्रेक्षक कौटुंबिक कथांवर नेहमी प्रेम करतात. ‘वडापाव’ त्यांच्या मनात नात्यांची खरी चव रुजवेल. टीझरवरूनच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं, हेच आमचं यश आहे.”
निर्माते निनाद बत्तीन म्हणाले, “जसा वडापावचा आस्वाद तीन पिढ्या घेतात, तसाच आमचा चित्रपट ‘वडापाव’ तीन पिढ्यांची गोष्ट सांगतो. हा पूर्ण कुटुंबाने पाहावा, असा चित्रपट आहे.”
निर्माते अमित बस्नेत म्हणाले, “मी नेपाळचा असूनही मराठी संस्कृती, खाद्यपदार्थ, साहित्य, कला यांबद्दल मला कायम आकर्षण वाटतं. वडापाव हा खाद्यपदार्थ भावनांशी जोडलेला आहे. जीवनात आपुलकीसोबत थोडा तिखटपणा हवाच, नाहीतर नातं फिकं होतं. हाच समतोल आमच्या चित्रपटात आहे.”
कौटुंबिक सिनेमा देणार खास मेजवानी
‘वडापाव’ हा सिनेमा प्रेक्षकांना हसवणार, रडवणार आणि विचार करायला लावणार अशी खात्री चित्रपटाच्या टीमने व्यक्त केली आहे. ओळखीच्या, पण नव्या चवीच्या या कथेची मेजवानी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर लवकरच मिळणार आहे.
