
सिनेमे आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आदिनाथ कोठारे आता छोट्या पडद्यावर दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवरील ‘नशिबवान’ या मालिकेतून तो पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेत दिसणार असून, रुद्रप्रताप घोरपडेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
रुद्रप्रताप घोरपडेची व्यक्तिरेखा
रुद्रप्रताप हा नागेश्वर घोरपडेचा एकुलता एक मुलगा आहे. दिसायला रुबाबदार, जणू एखादा राजकुमारच. स्वभावाने मात्र साधा, मनमिळावू आणि सर्वांची मदत करणारा. वडील नागेश्वर जिथे कडक आणि बिझनेसला प्राधान्य देणारे आहेत, तिथे रुद्रप्रतापने मात्र गावात राहून लोकांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.
आदिनाथ कोठारेसाठी ड्रीमरोल

या भूमिकेविषयी बोलताना आदिनाथ म्हणाला, “ही माझी पहिली दैनंदिन मालिका आहे. गेली अनेक वर्ष मालिका करण्याचा विचार होता, आणि नशिबाने ‘नशिबवान’ मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आला. टीव्ही हे प्रत्येकाचं आवडतं माध्यम आहे, मालिकेमुळे तुम्ही घराघरात पोहोचता, कुटुंबाचा भाग होता. ‘नशिबवान’ची कथा खूप सुंदर आहे आणि रुद्रप्रताप या व्यक्तिरेखेत अनेक पदर आहेत, जे हळूहळू उलगडतील.”
स्टार प्रवाहसोबतचे नातं
आदिनाथने पुढे सांगितले की, “स्टार प्रवाहसोबतचं माझं नातं खूप जुनं आहे. निर्माता म्हणून कोठारे व्हिजनची पहिली मालिका स्टार प्रवाहवरच आली होती. त्यानंतर अनेक सुपरहिट प्रोजेक्ट्स आम्ही सोबत केले. आता पुन्हा एकदा नवा प्रवास महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत सुरू होतोय याचा अतिशय आनंद आहे.”
प्रसारणाची वेळ आणि अपेक्षा
‘नशिबवान’ मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज असून गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात प्रेक्षकांसाठी ही एक खास भेट ठरणार आहे. आदिनाथला खात्री आहे की बाप्पाच्या आशीर्वादाने ही मालिका देखील प्रेक्षकांच्या मनात नक्की घर करेल. ‘नशिबवान’ १५ सप्टेंबरपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.
