
पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या आणि सिनेसृष्टीच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘कढीपत्ता’ हा आगामी मराठी चित्रपट आता आणखी चर्चेत आला आहे. नव्या पोस्टरद्वारे या चित्रपटाची नायिका रिद्धी कुमार असल्याचे उघड झाले असून, ७ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
निर्मिती आणि दिग्दर्शनाची नवी जोडी
युवान प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली असून, कथा व दिग्दर्शन विश्वा यांनी केले आहे. निर्माते आणि दिग्दर्शक या दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पदार्पणातच एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांसमोर आणण्याचे आव्हान विश्वा यांनी स्वीकारले आहे. पहिले पोस्टर नायिकेचा चेहरा न दाखवल्यामुळे चर्चेचा विषय ठरले होते. दुसऱ्या पोस्टरमध्ये भूषण पाटीलसोबत रिद्धी कुमारचा लूक उलगडला आहे.
भूषण पाटील आणि रिद्धी कुमारची नवी जोडी
चित्रपटात भूषण पाटील मुख्य भूमिकेत असून, त्याच्या जोडीला रिद्धी कुमार दिसणार आहे. पोस्टरमध्ये या दोघांची फ्रेश केमिस्ट्री स्पष्ट दिसते. रिद्धी कुमारचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. यापूर्वी तिने काही वेबसिरीज आणि दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले असून, प्रभासच्या ‘राधे श्याम’ आणि ‘द राजासाब’ यामध्ये ती झळकली आहे.
रिद्धी कुमारची भूमिका आणि अनुभव
या चित्रपटाबाबत बोलताना रिद्धी कुमार म्हणाली, “मराठी चित्रपटांमध्ये गोष्टीला नेहमी प्राधान्य दिलं जातं. या चित्रपटात जरी मी नायिकेच्या रूपात झळकत असले तरी खरा हिरो ही गोष्ट आहे. माझी व्यक्तिरेखा स्वतंत्र विचारांची आणि आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारी आहे. दिग्दर्शक विश्वा यांचं व्हिजन स्पष्ट होतं, तर निर्माता स्वप्नील मराठे यांनी दर्जेदार कलाकृती साकारण्यासाठी पूर्ण साथ दिली.”
कलाकारांची ताकदवान फळी
या चित्रपटात भूषण पाटील आणि रिद्धी कुमार या नव्या जोडीसोबत संजय मोने, शुभांगी गोखले, अक्षय टंकसाळे, गार्गी फुले, गौरी सुखटणकर, सानिका काशीकर, निशा माने आदी सहकलाकार आहेत. तर आनंद इंगळे, आनंदा कारेकर आणि चेतना भट पाहुण्या भूमिकेत दिसतील.
संगीत, तांत्रिक टीम आणि प्रदर्शित तारीख
गीतकार मंदार चोळकर, मुकुंद भालेराव आणि विनू सांगवान यांच्या गीतांना संगीतकार पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडल यांनी रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, अनन्या वाडकर, साज भट्ट आणि प्रियांशी श्रीवास्तवा यांच्या आवाजात सुरांचा साज चढवला आहे. छायांकन अनिकेत खंडागळे यांनी केले असून, संकलन ऋषीराज जोशी यांनी केले आहे. रंगभूषा किरण सावंत आणि वेशभूषा पल्लवी पाटील व गार्गी पाटील यांनी सांभाळली आहे. वितरणाची जबाबदारी सिनेपोलीसवर असून, कार्यकारी निर्माता विशाल चव्हाण तर प्रोजेक्ट हेड संयुक्ता सुभाष आहेत.
७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
अनोख्या प्रेमकथेवर आधारित ‘कढीपत्ता’ चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना एका नवीन जोडीसोबत ताजेतवाने सिनेमॅटिक अनुभव देणार आहे.
