
‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र देहू येथे ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाच्या कलाकारांनी संत तुकाराम महाराजांचे सगुण साकार रूप उभे केले. ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी डोक्यावर वारकरी पगडी, कपाळावर टिळा, गळ्यात माळा आणि हातात चिपळ्या घेऊन संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या पत्नी आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे.
संत तुकारामांच्या अभंगांचा सजीव अनुभव रुपेरी पडद्यावर
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीने जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले आणि मानवी जीवनाला परिपूर्णता दिली. हा सुखसंवाद आता रुपेरी पडद्यावरून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
पॅनोरमा स्टुडिओजची साथ

या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते पॅनोरमा स्टुडिओज असून, निर्माते कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक आहेत. सहनिर्माते मुरलीधर छतवानी आणि रवींद्र औटी आहेत. पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठक म्हणाले, “लोकसाहित्य, लोकसंगीत आणि लोकजीवन प्रादेशिक सिनेमांमध्ये उतरल्याने प्रेक्षकांना ते अधिक जवळचे वाटतात. चांगल्या संकल्पनेसोबत आम्ही नेहमीच उभे राहतो.” तर सीईओ मुरलीधर छतवानी यांनी सांगितले, “दर्जेदार संहिता आणि उत्तम कलाकार यामुळे या चित्रपटाला आम्ही ठाम साथ देत आहोत.”
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे विचार
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, “तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचे सुंदर सार दडलेले आहे. हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पॅनोरमा स्टुडिओजची भक्कम साथ आमच्यासोबत आहे.”
कथा, पटकथा आणि संगीताचा त्रिवेणी संगम
चित्रपटाची कथा व संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, पटकथा व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. वारकरी संगीत हा या चित्रपटाचा आत्मा असून, तब्बल दहा अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गांधी यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, नुपूर दैठणकर यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.
तांत्रिक टीमची साथ
छायांकन संदीप शिंदे यांनी केले असून, संकलन सागर शिंदे व विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांनी केली आहे. पार्श्वसंगीत मयूर राऊत, ध्वनी आरेखन निखिल लांजेकर व हिमांशू आंबेकर, साहसदृश्ये बब्बू खन्ना, नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज आणि संजय करोले यांनी सांभाळले आहे.
७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाद्वारे संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा, भक्तीचा आणि तत्वज्ञानाचा सजीव अनुभव रुपेरी पडद्यावर आणला जाणार आहे. हा भक्तिरसाचा सोहळा ७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
