नागेश मोरवेकर आणि आदित्य जी नायर यांच्या सुमधूर आवाजात गणेश वंदना

गणपती बाप्पाच्या आगमनाने वातावरण भक्तीमय होतं आणि प्रत्येक घरात बाप्पाची गाणी घुमू लागतात. अशा गाण्यांना प्रेक्षक कायम स्मरणात ठेवतात. यंदाच्या गणेशोत्सवातही रसिकांसाठी स्मरणरंजनाचा आनंद आणि भक्तीची अनुभूती देणारी नवी गणेश वंदना ‘आदित्य नायर प्रॉडक्शन’तर्फे सादर करण्यात आली आहे.

“तुला आम्ही पुजितो गौरी गणा” या वंदनेचा नवा आविष्कार

सुमारे पंचावन्न वर्षांपूर्वी जेष्ठ गीतकार हरेंद्र जाधव यांनी “आम्ही पुजितो गौरी गणा” ही अमूल्य वंदना लिहिली होती. जवळपास दहा हजारांहून अधिक गीते रचणाऱ्या या गीतकारांच्या लेखणीतून उमटलेली ही ओजस्वी वंदना आता नव्या स्वरूपात रसिकांपर्यंत पोहोचली आहे. आदित्य नायर प्रॉडक्शनने या गीताचा नवा व्हिडीओ सादर केला आहे.

नागेश मोरवेकर आणि बालगायक आदित्य जी नायर यांचा संगम

या प्रसिद्ध वंदनेला अभिनेते आणि गायक नागेश मोरवेकर यांनी आपल्या दमदार आवाजात सजीव केलं आहे. त्यांना साथ मिळाली आहे बालगायक आदित्य जी नायरच्या सुमधुर आवाजाची. किशोर मोहिते यांनी दिलेल्या संगीतसाजामुळे या गाण्याला वेगळाच उठाव लाभला आहे.

आदित्य जी नायरची भक्तिगीतांमधील वाटचाल

आदित्य जी नायरने अल्पावधीतच भक्तिगीतांच्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यावर्षी त्यांनी सर्वात लहान वयात संस्कृतमधील गणपती अथर्वशीर्ष गायले आणि रेकॉर्ड केले. त्यांच्या निष्ठेचा प्रत्यय “तुला आम्ही पुजितो गौरी गणा” या पारंपरिक गीतातून आणि “विनवितो तुला गौरी नंदना” या नवकल्पनाशील गीतातून आला आहे. “विनवितो तुला गौरी नंदना” या गीताची रचना तारका हरेंद्र यांनी केली आहे. ही दोन्ही गाणी आदित्य नायर प्रॉडक्शन्स युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत.

गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारी वंदना

गणपती बाप्पाचा उत्सव हा आनंद, उत्साह आणि भक्ती यांचं प्रतीक आहे. हा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी ही वंदना सर्व रसिकांसाठी आणली असल्याचं नागेश मोरवेकर आणि आदित्य नायर यांनी सांगितलं. त्यांचा विश्वास आहे की ही वंदना प्रेक्षकांना चैतन्य आणि भक्तिभावाची अनुभूती देईल.

Leave a comment