माजी लष्कर अधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडणार – ‘ऑपरेशन सिंदूर : नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’

‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी गणेशोत्सव

‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव २०२५ हा भक्तिभावासोबतच सामाजिक भान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा ठरणार आहे. या विशेष पर्वात माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (नि.) आणि माजी लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस (नि.) यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार व लेखक डॉ. उदय निरगुडकर या दोन्ही मान्यवरांना बोलतं करणार आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’ या विषयावर विशेष संवाद

ही रोचक मुलाखत दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वाजता, ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर (प), मुंबई येथे होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.

ले. ज. विनायक पाटणकर (नि.) यांचा लष्करी प्रवास

जवळपास चार दशके भारतीय सेनेत कार्यरत असताना त्यांनी काश्मीर, ईशान्य भारत, आर्मी एव्हिएशन आणि दिल्ली मुख्यालय येथे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. उत्तम युद्ध सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक या सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. निवृत्तीनंतरही ते औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था तसेच सरहद आणि असीम या संस्थांद्वारे राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत आहेत.

ले. ज. सुदर्शन श्रीकांत हसबनीस (नि.) यांची कारकीर्द

जानेवारी २०२० मध्ये डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदावरून निवृत्त झालेले हसबनीस यांनी कारगिल युद्धातील ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम तसेच जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परम विशिष्ट सेवा पदक (PVSM) आणि विशिष्ट सेवा पदक (VSM) यांनी ते सन्मानित झाले असून सध्या ते पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांशी जोडलेले आहेत.

डॉ. उदय निरगुडकर यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

पत्रकारिता, व्यवस्थापन आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे डॉ. उदय निरगुडकर यांनी पुणे विद्यापीठातून मार्केटिंग मॅनेजमेंट विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. टाटा, गोदरेज यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर त्यांनी काम केले आहे. लोकल ते ग्लोबल, All About Winning Indian Elections यांसारखी पुस्तके तसेच C.E.O. ही कादंबरी त्यांनी लिहिली आहे. राष्ट्रभक्ती जपणारे उपक्रम राबविण्यात त्यांचा सातत्याने सहभाग असतो.

Leave a comment