
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव सर्वत्र वाढले आहेत. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही स्पर्धेच्या युगात अभ्यासाचा मोठा ताण सहन करावा लागत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून तर्कशक्ती, भाषा, अनुशासन आणि क्रमबद्धतेचा विकास थांबतो आहे. या समस्येवर उपाय म्हणून यंदा शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाने “व्हा Creative, व्हा Active” ही विशेष थीम साकारली आहे.
Left Brain Therapy ची अनोखी संकल्पना
या सजावटीत Left Brain Therapy चा वापर करण्यात आला आहे. डॉ. सुमित पाटील यांनी संकल्पना मांडली असून या थेरपीद्वारे विचारशक्ती, युक्तिवाद, भाषा आणि अनुशासनाचा विकास साधला जातो. गणपतीच्या नावांची अक्षरे शोधण्याचे शब्दकोडे, रंगसंगतीनुसार चित्रं रंगवणे, वेगवेगळे आकार जोडून तयार होणाऱ्या प्रतिमांमधून दैनंदिन जीवनातील माणसांचे महत्त्व समजावणे अशा उपक्रमांचा यात समावेश आहे. चौकोनातील विविध आकारांवरून गोष्टी किंवा कविता तयार करण्याचाही प्रयोग या सजावटीत आहे.
सजावटीचे सामाजिक भान आणि सर्वसमावेशकता

सजावट पर्यावरणपूरक ठेवली असून दिव्यांग भक्तांसाठी रॅम्प आणि ब्रेल लिपीचा वापर करण्यात आला आहे. आकर्षक आणि रंगीत चित्रांमुळे लहान मुलांना स्क्रिनपासून दूर ठेवून विविध अॅक्टिव्हिटीत रमवण्याचा उद्देश साधला जात आहे.
सामाजिक उपक्रमांची परंपरा
हे मंडळ फक्त सजावटीपुरते मर्यादित नाही. दरवर्षी येथील गरजू भाविकांना आणि भटक्या, विमुक्त जातीतील मुलांना शालेय वस्तू वाटल्या जातात. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत दर सकाळी के.ई.एम. आणि टाटा हॉस्पिटल येथे गरजूंना मोफत नाश्ता पुरवण्याचाही उपक्रम चालतो.
गणरायाच्या आशीर्वादासह वेगळा अनुभव
गणेशोत्सव हा बुद्धी आणि शक्तीच्या देवतेचा सोहळा आहे. “व्हा Creative, व्हा Active” या थीमद्वारे यंदा शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळ भक्तांना नव्या दृष्टीकोनातून विचार आणि अनुभव देणार आहे.
गणपती बाप्पा मोरया!
