
‘अरण्य’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटातील ‘रेला रेला’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गाण्यातील सांस्कृतिक रंगत
हार्दिक जोशी आणि वीणा जगताप यांच्या लग्नसोहळ्यावर चित्रित हे गाणे ऊर्जा, उत्साह आणि पारंपरिक ढंग यांनी परिपूर्ण आहे. गायक अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजात सादर झालेल्या या गाण्याला नितीन उगलमुगळे यांचे आकर्षक संगीत लाभले आहे. गाण्याचे पारंपरिक बोल आणि मुकुंद भालेराव यांनी लिहिलेले अतिरिक्त बोल या गाण्याला खास बनवतात. ठेक्यांची लय आणि विदर्भातील सांस्कृतिक झलक प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडते.
दिग्दर्शक आणि निर्मात्यांची प्रतिक्रिया
दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांच्या मते, ‘‘‘रेला रेला’ हे गाणे प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे. अवधूत गुप्ते यांचा दमदार आवाज आणि नितीन उगलमुगळे यांचे कमाल संगीत गाण्याला चारचाँद लावतात.’’
निर्माता शरद पाटील म्हणाले, ‘‘‘अरण्य’मधून आम्ही प्रेक्षकांना एक भावनिक प्रवास घडवण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टरला, टिझरला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता ‘रेला रेला’ गाणे प्रदर्शित झाले असून हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’’
चित्रपटाची माहिती
एस एस स्टुडिओ निर्मित आणि एक्स्पो प्रस्तुत ‘अरण्य’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अमोल दिगांबर करंबे यांनी केले आहे. शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतिका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हा भव्य प्रवास येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
