
शतकमहोत्सवी सोहळ्यात आगळावेगळा उपक्रम
‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव २०२५ विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. भक्तिभाव आणि मनोरंजनासोबत सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव जपणाऱ्या या सोहळ्यात आता ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमातून गणेशभक्तांना हस्तरेषांचे गूढ उलगडण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
हस्तरेखांचे रहस्य जाणून घेण्याची संधी
भविष्याविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असते आणि त्यासाठी तज्ञांची आवश्यकता असते. या क्षेत्रातील तज्ञ प्रद्योत पेंढरकर यांची उपस्थिती या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरणार आहे. २०१४ मध्ये हस्तसामुद्रिक शास्त्राचे औपचारिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘शास्त्रोक्त ज्योतिष केंद्र’च्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन केले आहे. नामवंत कलाकार, राजकारणी यांच्यासह सामान्य नागरिकांनी त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेतला आहे.
चित्रपटसृष्टीतील योगदान
हस्तसामुद्रिक शास्त्रासोबतच प्रद्योत पेंढरकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही योगदान दिले आहे. त्यांच्या ‘राजवरस प्रोडक्शन’तर्फे शेर शिवराज आणि सुभेदार यांसारखे ऐतिहासिक चित्रपट निर्मिले गेले असून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत.
विशेष प्रकट मुलाखत
‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’ या कार्यक्रमात प्रद्योत पेंढरकर यांची उत्कंठावर्धक प्रकट मुलाखत होणार असून ही मुलाखत सर्वेश देशपांडे घेणार आहेत. कार्यक्रम दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वाजता, ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर (प), मुंबई येथे होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून आयोजक मंडळाने नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
