
दादासाहेब फाळके चित्रनगरीत रंगला चित्रसंवाद
मुंबई, ता. ३ : दादासाहेब फाळके चित्रनगरीची परंपरा असलेल्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या चित्रसंवाद कार्यक्रमात व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते मराठी कलाकार व माध्यमकर्मींचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम चित्रनगरीच्या `बाप्पा’च्या मंडपात मोठ्या उत्साहात पार पडला.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा
यंदाच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने राज्यभरात गणपती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. चित्रनगरीत `चित्रनगरीच्या राजा’ची प्राणप्रतिष्ठापना करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून चित्रसंवाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कलाकार व मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला सिनेक्षेत्रातील अभिनेता सुशांत शेलार, प्रमोद पवार, संदीप पाठक, महेश लिमये, दिग्दर्शक दीपक पाटील, गायक रोहित राऊत, अभिनेत्री मेघा धाडे, श्रेया बुगडे, भार्गवी चिरमुले, तेजस्विनी लोणारे, अक्षया गुरव, दैवता पाटील, निवेदिका मानसी सोनटक्के, तसेच घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर आणि कलाकार उपस्थित होते.

माध्यमकर्मी आणि संस्थांचा सन्मान
कलाकारांसोबतच सिने समीक्षक डॉ. संतोष पाठारे, ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर, संपादक सचिन परब, नीला टेलिफिल्मचे असिद मोदी, विस्लिंग वूडसचे चैतन्य चिंचलीकर, फ्राइम फोकसचे सुनील धैया, बॉलिवूड पार्कचे संतोष मिजगर, निर्माता महामंडळाचे बाळासाहेब गोरे, देवेंद्र मोरे, कलादिग्दर्शक डॉ. सुमीत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
चित्रनगरी व्यवस्थापनाची उपस्थिती
या सोहळ्यात चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. कलाकार, माध्यमकर्मी आणि संस्थांचा सन्मान करून या शताब्दी वर्षीचा गणेशोत्सव अधिक संस्मरणीय ठरला.
