
तारिणीसमोर नवी जबाबदारी
आतापर्यंत हुशारी आणि धाडसाने अनेक अंडरकव्हर ऑपरेशन्स यशस्वी पार पाडणाऱ्या तारिणीसमोर या गणेशोत्सवात नवी आणि अत्यंत महत्त्वाची केस आली आहे. न्यायप्रिय, निर्भीड आणि नियमांच्या बाबतीत कडक म्हणून ओळखले जाणारे न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळते. त्यांनी पोलिस संरक्षण नाकारल्याने परिस्थिती अधिक धोकादायक ठरते. गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असल्याने धोका अधिकच वाढतो. ही जबाबदारी तारिणी आणि तिच्या टीमवर सोपवली जाते.
विसर्जन मिरवणुकीतील थरारक मिशन
गणेश विसर्जनाच्या दिवशी तारिणीला मिळालेली एक टीप प्रकरण अधिक गंभीर बनवते. त्यानुसार, विसर्जन मिरवणुकीदरम्यानच न्यायमूर्तींची हत्या करण्याचा कट रचला गेला आहे. अशा वेळी, सामान्य नागरिकांना दुखापत होऊ न देता न्यायमूर्तींचा जीव वाचवण्याची जबाबदारी तारिणीवर येते. भक्तीच्या जल्लोषात कर्तव्य पार पाडताना होणारी ही धडपड प्रेक्षकांसाठीही थरारक ठरणार आहे.
शिवानी सोनारचा खास अनुभव

तारिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार या विशेष एपिसोडसाठी गायमुख, मुंबई येथे प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीदरम्यान शूटिंगसाठी सहभागी झाली. त्या अनुभवाबद्दल शिवानी म्हणाली, “रिअल लोकेशनवर शूट करणं खूपच आव्हानात्मक होतं. गर्दीत शूट करताना वेळ आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक होतं. हा सीन अवघड होता, पण आमच्या संपूर्ण टीमचं आणि दिग्दर्शक भीमराव मुडे सरांच्या मार्गदर्शनाचं उत्तम नियोजन असल्यामुळे तो यशस्वी झाला. सिनेमात पाहिलेले ऍक्शन सीन्स आता टीव्हीवर अनुभवायला मिळणार आहेत.”
तिने पुढे सांगितले, “वैयक्तिकरित्या मला गणेश विसर्जन पाहायला आवडत नाही, कारण मला त्यावेळी त्रास होतो आणि रडू येतं. पण शूटिंगदरम्यानचा अनुभव मात्र खास होता. प्रेक्षक मला ‘तारिणी’ म्हणून हाक मारत होते, प्रेम व्यक्त करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, दिलेली दाद – हे सगळं माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.”
उमेश जगताप विशेष भूमिकेत

या स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेता उमेश जगताप न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांच्या भूमिकेत झळकणार असून त्यांच्या अभिनयामुळे या कथेला आणखी वजन मिळणार आहे.
भक्ती आणि कर्तव्याचा संगम
हा गणेशोत्सव स्पेशल एपिसोड प्रेक्षकांना भावनिक, थरारक आणि प्रेरणादायी अनुभव देणार आहे. भक्तीच्या सागरात कर्तव्याचा मार्ग कसा सांभाळला जातो, हे *‘तारिणी’*च्या माध्यमातून पाहायला मिळेल.
तेव्हा बघायला विसरू नका ‘तारिणी’, सोम-शुक्र, रात्री ९:०० वा., फक्त झी मराठीवर.
