
गाण्यात प्रभाकर मोरे आणि धनश्री काडगावकर
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रिय ठरलेलं अभिनेते प्रभाकर मोरे यांचं ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘लास्ट स्टॉप खांदा’ या आगामी चित्रपटातून हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नुकतंच सोशल मीडियावर लाँच झालेलं हे गाणं प्रभाकर मोरे आणि अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.
चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन
‘लास्ट स्टॉप खांदा… प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट’ हा संगीतमय चित्रपट येत्या २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. शिवम फिल्म क्रिएशन, सिग्नेचर ट्यून्स आणि स्नेहा प्रॉडक्शन्स यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे निर्माते असून, सचिन कदम आणि अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केलं आहे.

संगीत आणि गाण्याची लोकप्रियता
या चित्रपटातील ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं विशेष आकर्षण ठरत आहे. श्रमेश बेटकर लिखित या गाण्याला किशोर मोहिते यांनी संगीत दिलं आहे. आनंद शिंदे यांच्या प्रभावी आवाजामुळे गाणं अधिकच खुललं आहे. त्यांच्या सदाबहार गायकीमुळे हे गाणं आता महाराष्ट्रभर गाजणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
कलाकार आणि तांत्रिक टीम
या चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर आणि अभिनेत्री जुईली टेमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यांच्यासोबत निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश काप्रेकर आणि प्रियांका हांडे अशी दमदार स्टारकास्ट आहे. पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर आणि अशोक ढगे यांचाही समावेश आहे. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांनी केलं असून संकलन सुनील जाधव यांचं आहे. कलादिग्दर्शक म्हणून केशव ठाकुर यांनी काम पाहिलं आहे.
गीत आणि नृत्यदिग्दर्शन
श्रमेश बेटकर आणि श्रेयस राज आंगणे लिखित गीतांना श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचं संगीत लाभलं आहे. नृत्यदिग्दर्शन राहुल बनसोडे आणि रवी आखाडे यांनी केलं आहे. कार्यकारी निर्माता म्हणून विशाल खंदारे यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
प्रदर्शनाची तारीख
मनोरंजन, संगीत आणि भावनांची सांगड घालणारा ‘लास्ट स्टॉप खांदा… प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
