
चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच
“कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विजय कलमकर दिग्दर्शित हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला असून, उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे.
ग्रामीण भागातील रखडणाऱ्या लग्नांचा विषय
सध्या राज्यभरातील ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही मोठी समस्या झाली आहे. गावातील मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्या आयुष्याबद्दलही काही इच्छा-आकांक्षा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशा दोन टोकांमध्ये दरी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे आणि परस्पर नातेसंबंध यांची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे. गंभीर विषयाची अत्यंत मनोरंजक हाताळणी या चित्रपटात दिसून येते.
निर्मिती आणि दिग्दर्शन
सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि एम. व्ही. शरतचंद्र यांनी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजीत आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांनी केले असून, दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केलं आहे.

कलाकारांची दमदार स्टारकास्ट
या चित्रपटात वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत यांसारखे लोकप्रिय अभिनेते दिसणार आहेत. यासोबतच अमेय परब, शेखर बेटकर आणि अनघा राणे हे नवोदित कलाकार देखील आपल्या भूमिकेत प्रेक्षकांना भावणार आहेत.
तांत्रिक बाजू आणि संगीत
रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कलमकर यांनी संकलन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, तर चंचल काळे आणि अमरजीत आमले यांनी गीतलेखन केले आहे. संगीत दिग्दर्शन अक्षय खोत यांचे असून पार्श्वसंगीताची जबाबदारी त्यांनी निभावली आहे. वितरक म्हणून पिकल एंटरटेनमेंट काम पाहणार आहे.
प्रदर्शनाची तारीख
माती आणि नाती जोडणारा, प्रत्येक कुटुंबाची गोष्ट सांगणारा कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर १९ सप्टेंबरपासून पाहता येणार आहे.
