
मराठीतील पहिली हॉरर ओरिजिनल वेब सिरीज आता टीव्हीवर
‘अंधार माया’ ही मराठीतील पहिली हॉरर ओरिजिनल वेब सिरीज आता प्रेक्षकांना ओटीटीवरून थेट टीव्हीवर अनुभवता येणार आहे. ही एक अंगावर शहारे आणणारी, हृदयाचे ठोके चुकवणारी कथा आहे जी प्रेक्षकांना गूढ आणि थरारक प्रवासाला घेऊन जाणार आहे.
कोकणच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी रहस्यमय कथा
कथेचा केंद्रबिंदू आहे एक जुना वाडा आणि खातू कुटुंब, जे एका शेवटच्या विधीसाठी गावात परत येतं. पण त्यांच्या स्वागताला उभं असतं एक भयावह सत्य. कोकणाच्या धुंध आणि गूढ वातावरणात उलगडणारी ही रहस्यकथा कौटुंबिक नात्यांचं जाळं, थरकाप उडवणारा हॉरर अनुभव आणि अनपेक्षित वळणांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे दिग्दर्शित सिरीज
‘अंधार माया’ची निर्मिती एरिकॉन टेलेफिल्म्सने केली असून दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी केलं आहे. कथानक प्रल्हाद कुडतरकर आणि कपिल भोपटकर यांनी लिहिलं आहे. या सिरीजमध्ये दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते किशोर कदम यांची प्रभावी भूमिका आहे. त्यांच्या अभिनयामुळे कथेला अधिक भेदक आणि वास्तवदर्शी स्पर्श लाभणार आहे.
भीतीसोबतच भावनिक आणि सांस्कृतिक प्रवास
ही सिरीज केवळ हॉरर अनुभव न राहता प्रेक्षकांना मानसिक, भावनिक आणि सांस्कृतिक प्रवास घडवते. प्रत्येक खोलीतील गूढ, प्रत्येक सावलीत दडलेलं रहस्य आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना यामुळे ‘अंधार माया’ एक आगळावेगळा अनुभव ठरेल.
प्रसारणाची वेळ
टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच ओटीटीवरून थेट टीव्हीवर ‘अंधार माया’ चा भव्य प्रीमियर १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. प्रेक्षकांनी हा रोमांचक अनुभव चुकवू नये, असं आवाहन झी मराठीकडून करण्यात आलं आहे.
