अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘महती अष्टविनायकाची’ गीत प्रकाशित

अष्टविनायकाच्या महिम्याचं अनोखं संगीतमय दर्शन
गणेशभक्तांसाठी खास तयार करण्यात आलेलं ‘महती अष्टविनायकाची’ हे धमाकेदार गीत नुकतंच प्रकाशित झालं आहे. स्वरपर्व आणि संगीतकार चिनार-महेश यांच्या संगीतमय सादरीकरणातून आलेलं हे गीत गणेशभक्तांना एक अनोखी मेजवानी ठरणार आहे. आजवर श्री गणेशावर अनेक गीते आली असली तरी अष्टविनायकावर गाण्यांची संख्या फारच कमी आहे. विशेष म्हणजे सचिन पिळगांवकर यांच्या अष्टविनायक (१९७९) चित्रपटातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ नंतर असे लक्षवेधी गीत सादर झालेले नव्हते.

स्वरपर्व आणि चिनार-महेश यांचा अनोखा उपक्रम
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्वरपर्व संस्थेने आणि अनुदीप माळवी यांनी चिनार-महेश या लोकप्रिय जोडीला घेऊन ‘महती अष्टविनायकाची’ ही ध्वनिचित्रफीत साकारली आहे. सहनिर्माती म्हणून ॲड. प्रणिता देशपांडे यांचे योगदान राहिले आहे. गजलकार संदीप माळवी यांच्या लेखणीतून गीत साकारलं असून त्याला चिनार-महेश यांनी स्वरसाज दिला आहे. तरुण गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका सोनाली सोनावणे यांच्या आवाजात गाणं रंगतदार झालं आहे.

दिग्दर्शन, अभिनय आणि नृत्याची रंगत
या गाण्याचं दिग्दर्शन तरुण दिग्दर्शक अभिजीत दाणी यांनी केलं असून, यात अभिनेता आयुष्य संजीव आणि अभिनेत्री प्रतिभा जोशी यांच्या नृत्याभिनयाने गाण्याला वेगळी उंची मिळाली आहे. त्यांच्यासोबत बालकलाकार शोर्या टोकरे हिचा नृत्यप्रयोग विशेष ठरतो. नृत्यदिग्दर्शन दिनेश शिरसाट यांनी करत ग्रामिण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तिभाव आणि थिरकायला लावणारा जल्लोष साकारला आहे.

संगीत संयोजन आणि निर्मितीतील बारकावे
या ध्वनिचित्रफितीचं मार्गदर्शन विजय सोनावणे आणि चेतन भारिया यांनी केलं आहे. संगीत संयोजनाची जबाबदारी संकेत गुरव यांनी पार पाडली असून, व्यवस्थापन प्रियांका क्षत्रिय आणि अभिषेक क्षत्रिय यांनी सांभाळलं आहे.

गणेशभक्तांसाठी खास मेजवानी
‘महती अष्टविनायकाची’ हे गीत चिनार-महेश ऑफिशियल युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झालं असून, सी एन एम म्युझिक फॅक्टरी लेबलखाली सादर करण्यात आलं आहे. हे गाणं तमाम गणेशभक्तांना भारावून टाकेल, असा विश्वास स्वरपर्वचे अनुदीप माळवी आणि संगीतकार चिनार-महेश यांनी व्यक्त केला आहे.

Leave a comment