
रोमँटिक गाण्याची नवी जोडी – अंकिता मेस्त्री आणि जगदीश झोरे
‘जाऊबाई गावात’ फेम अभिनेत्री अंकिता मेस्त्री आणि अभिनेता जगदीश झोरे यांच्यावर चित्रित झालेलं ‘इंस्टाची स्टार’ हे नवं रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गाण्याला अभिजीत दाणी यांनी दिग्दर्शन केलं असून संगीत रोहित पाटील यांचं आहे. गायक शैलेश राठोड आणि गायिका कृतिका बोरकर यांच्या आवाजाने सजलेलं हे गाणं नाशिकच्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे.
प्रेमकथेचं तरुणाईला भावणारं गाणं
या गाण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून मेहनत घेऊन स्वप्नं रंगवणाऱ्या तरुण प्रेमकथेला वेगळ्या शैलीत सादर करण्यात आलं आहे. जय पालवकर निर्मित या गाण्याची कथा त्यांनी स्वतः लिहिली आहे. कोरिओग्राफी दिनेश शिरसाठ यांनी केली असून, कॉस्ट्यूम आणि ईपीचं काम प्रियांका आणि अभिषेक क्षत्रिय यांनी सांभाळलं आहे.

अंकिता मेस्त्रीची प्रतिक्रिया
गाण्याविषयी बोलताना अंकिता म्हणाली, “इंस्टाची स्टार खूप सुंदर गाणं आहे. मला ऐकताच या गाण्यासाठी होकार द्यावा असं वाटलं. यातून एक वेगळी वाईब येते. विशेष म्हणजे हे गाणं तरुणाईला आणि सोशल मीडिया वापरणाऱ्या जनरेशन Z ला खास भावेल. माझ्या फॅन्सना विनंती करते की जस तुम्ही माझ्या आधीच्या गाण्यांना प्रेम दिलं तसंच या गाण्याला द्या आणि रील व्हिडिओ बनवून मला टॅग करा.”
निर्माता आणि दिग्दर्शकांचा अनुभव
निर्माता जय पालवकर म्हणाले की, “श्रीजय क्रिएशन हे स्वतंत्र म्युझिक चॅनल असून आम्ही दर्जा टिकवून ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. इंस्टाची स्टार गाण्याची कल्पना मनाला भिडली आणि त्यावर आम्ही काम केलं. खात्री आहे की प्रेक्षक या गाण्यावर थिरकतील.” दिग्दर्शक अभिजीत दाणी म्हणाले की, “गाण्याचं शूट पावसाळ्यात नाशिकमध्ये झालं. अंकिताने कठीण परिस्थितीतही उत्तम परफॉर्मन्स दिला. त्यामुळे गाण्याला खास रंग आला.”

कलाकारांचा प्रवास
अभिनेत्री अंकिता मेस्त्री याआधी ‘जाऊबाई गावात’ या रिएलिटी शोमुळे चर्चेत आली होती, तसेच तिची ‘नखरेवाली’ आणि ‘झुमका’ ही गाणी हिट झाली होती. तर अभिनेता जगदीश झोरे याची ‘लयभारी दिसते पोर’ आणि ‘रंभा’ ही गाणी लोकप्रिय आहेत.
ट्रेंडिंग गाण्याची नवी धून
‘इंस्टाची स्टार’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे हे गाणं तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये जलदगतीने स्थान मिळवत आहे.
