
इंडियन आयडॉलपासून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला गायक अभिजीत सावंत आपल्या गायन प्रवासाला २० वर्ष पूर्ण करताना नवनव्या प्रयोगांना हात घालत आहे. या वेळी त्याने गुजराती भाषेत पहिलं वहिलं गाणं गाऊन प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज दिलं आहे.
नवरात्रीसाठी खास गिफ्ट
नवरात्री उत्सव अगदी तोंडावर असताना अभिजीतचं ‘प्रेमरंग सनेडो अस’ हे गुजराती गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात गरब्याचा ठेका आणि उत्सवाची रंगत अनुभवायला मिळत असून, मराठीसोबतच गुजराती प्रेक्षकांनाही अभिजीतच्या आवाजाची जादू अनुभवता येणार आहे.
गायकाचा अनुभव
या नव्या गाण्याबद्दल बोलताना अभिजीत सावंत म्हणतो, “एखादं छान गुजराती फेस्टिवल गाणं करण्याची माझी आधीपासून इच्छा होती. ‘प्रेमरंग सनेडो अस’ सारखं गरब्याचं गाणं करताना वेगळाच आनंद मिळाला. सोबतच नव्या भाषेत प्रयोग करण्याची संधी मिळाली. गुजराती गाण्याला थोडा मराठमोळा ठसका देत दोन वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती एकत्र गुंफण्याचा अनुभव घेताना खूप मजा आली.”
गुजराती प्रेक्षकांसाठी नवा अध्याय
आजवर अनेक सदाबहार गाणी देऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या अभिजीत सावंतने आता गुजराती प्रेक्षकांना देखील आपला मोहिनीमय आवाज सादर करण्यासाठी पाऊल टाकलं आहे. या नव्या गाण्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आणखी आनंद आणि उत्सुकता वाढली आहे.
