सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी ‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

मराठी भाषेचं सामर्थ्य, तिचं जतन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचा हात धरून मराठी ही ज्ञानार्जन आणि अर्थाजनाची भाषा व्हावी या हेतूने सुमन एंटरटेनमेंटने ‘अभिजात मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मची मुहूर्तमेढ रोवली. ‘अभिजात मराठी’ या ॲपचा लोकार्पण सोहळा नुकताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

‘अभिजात मराठी’ सारखा ओटीटी प्लॅटफॉर्म आज काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘अभिजात मराठी’च्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करताना त्यांनी या ॲपमुळे मराठीच्या संवर्धनासाठी मोठी मदत होईल असे नमूद केले. मराठीतून आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी हा ओटीटी प्लॅटफॉर्म आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार

मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक विषयांबरोबरच मराठी साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणं हा ‘अभिजात मराठी’चा उद्देश आहे. असंख्य चांगल्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही केले.

ॲपची वैशिष्ट्ये आणि उद्देश

या ॲपची निर्मिती करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे आपली मराठी भाषा आणि संस्कृती टिकवणं हा आहे. ‘अभिजात मराठी’ ॲपवर मराठी सिनेमा, नॉन-फिक्शन शो, वेबसिरीज, आंतरराष्ट्रीय डब कंटेंट अशा विविध प्रकारच्या मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हा ॲप मोफत असून कोणीही सहजरीत्या डाऊनलोड करू शकतो.

९ तारखेपासून प्रेक्षकांना चित्रपटांचा आनंद

येणाऱ्या ९ तारखेपासून या ॲपवर चित्रपटांचा आस्वाद घेता येईल. सध्या अनेक मराठी कलाकृतींना प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर कमी प्राधान्य दिलं जातं. अशा परिस्थितीत ‘अभिजात मराठी’ हे त्यावर एक हक्काचं आणि प्रभावी उत्तर ठरणार आहे.

Leave a comment