
धैर्य, जिद्द आणि सामर्थ्याच्या अदम्य प्रवासाची नवी सिनेमॅटिक गाथा
मराठी चित्रपटसृष्टीतून नेहमीच वेगळ्या आणि अर्थपूर्ण विषयांची मांडणी करणारे अभिनेता-निर्माते श्रेयस तळपदे आणि त्यांची ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी कथा घेऊन येत आहेत. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो स्त्रीच्या सामर्थ्याला, तिच्या सहनशीलतेला आणि तिच्या अदम्य धैर्याला उजाळा देणारा आहे. काळ कितीही बदलला, असुरांचे सावट कितीही दाटले तरीही इतिहासाने दाखवून दिले आहे की एका “मर्दिनी”चे धैर्यच अंधारावर विजय मिळवण्यासाठी पुरेसे असते.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाची नांदी संपन्न
विजयादशमीच्या मंगल प्रसंगी या चित्रपटाची नांदी संपन्न झाली. ‘मर्दिनी’ हा चित्रपट प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेल्या सुप्त शक्तीचं प्रतीक ठरणार आहे. “असू देत लाख महिषासुर… पुरे आहे फक्त एक मर्दिनी” या संकल्पनेवर आधारित हा सिनेमा समाजातील अन्याय, दुष्टता आणि अंधाराविरुद्ध उभं राहणाऱ्या एका सामान्य स्त्रीच्या अलौकिक शौर्याची कथा सांगेल.
श्रेयस तळपदे यांचा आत्मविश्वास आणि नव्या दिग्दर्शकाचा प्रवास
निर्माते श्रेयस तळपदे म्हणाले, “प्रेक्षकांना नेहमी काहीतरी वेगळं देण्याची परंपरा ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स ने कायम ठेवली आहे. पोस्टर बॉईज, बाजी आणि सनई चौघडे यांसारख्या चित्रपटांमधून मिळालेलं प्रेम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. गुणवंतांना संधी देण्याच्या आमच्या परंपरेनुसार या वेळेस आम्ही दिग्दर्शक अजय मयेकर यांना पहिल्यांदाच दिग्दर्शनाची संधी दिली आहे.” त्यांनी पुढे सांगितलं की, “मर्दिनी हा केवळ एक सिनेमा नाही, तर तो प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेल्या अंतर्गत शक्तीला साजरा करणारा एक उत्सव आहे. या चित्रपटातून समाजात सकारात्मकतेचा आणि आत्मविश्वासाचा संदेश पसरवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
२०२६ साली प्रदर्शित होणार भव्य चित्रपट
‘मर्दिनी’ या चित्रपटाचं भव्य चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. चित्रपटातील कलाकार, तांत्रिक टीम आणि इतर तपशील लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जातील. श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त निर्मितीतील ही महत्त्वाकांक्षी कलाकृती २०२६ साली प्रेक्षकांच्या भेटीस मोठ्या पडद्यावर येणार असून, मराठी चित्रपटविश्वात एक नवा मापदंड निर्माण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
