
माती आणि नाती जोडणाऱ्या सिनेमाला रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद
१९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाने प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांची मने जिंकली आहेत. स्पंदन परिवार या लोकचळवळीतून जन्माला आलेल्या या सिनेमाने नातं, माणुसकी आणि मातीतल्या भावनांना स्पर्श केला आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या चित्रपटाचं कौतुक करत म्हटलं, “कुर्ला टू वेंगुर्ला हा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा सिनेमा आहे.” तर दिग्दर्शिका सई परांजपे यांनी गौरवपूर्ण शब्दांत म्हटलं, “हा सिनेमा म्हणजे कलेच्या बजबजपुरीत वाजणारं खणखणीत नाणं आहे.” सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा होत असून, प्रेक्षकांच्या तोंडी हा सिनेमा अक्षरशः गाजतो आहे.
हाऊसफुल शो असूनही थिएटरमधून काढला सिनेमा
चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून जोर धरत असतानाच, साउथचा ‘कांतारा’ प्रदर्शित झाला आणि त्याच्या लाटेत ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ जवळजवळ सर्व थिएटरमधून काढण्यात आला. सध्या या चित्रपटाचा फक्त एक शो गोरेगावच्या ‘मूव्हीटाइम हब’ येथे सुरू आहे — आणि तो दररोज हाऊसफुल! बॉलीवूड आणि साउथ चित्रपटांना प्राधान्य मिळत असताना मराठी चित्रपटांना दिलं जाणारं दुय्यम स्थान पुन्हा एकदा स्पष्ट झालं. या अन्यायकारक परिस्थितीवर चर्चा होते, पोस्ट्स होतात, पण ठोस पावलं मात्र घेतली जात नाहीत.

थिएटर नाहीत तर काय, वेंगुर्ल्यात रसिकांनी लावले स्वतःचे शो!
थिएटर न मिळाल्यानंतरही रसिक प्रेक्षकांनी हार मानली नाही. वेंगुर्ल्यातील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात ‘कुर्ला टू वेंगुर्ला’चे दोन शो लावले गेले आणि दोन्ही हाऊसफुल! एवढंच नव्हे तर प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीमुळे एका दिवसात चार शो ठेवावे लागले — आणि काही मिनिटांतच हे चारही शो हाऊसफुल! झाले. अशा प्रकारे वेंगुर्लेकरांनी अक्षरशः या चित्रपटाला डोक्यावर घेतलं.
हास्य, वास्तव आणि भावनांचा संगम — प्रेक्षकांना भिडलेली कथा
मुलांची न होणारी लग्नं, शहराचं आकर्षण आणि ग्रामीण जीवनाचं वास्तव या विषयांवर आधारित हा सिनेमा हसवत-हसवत अंतर्मुख करतो. मराठी चित्रपट चालत नाहीत अशी तक्रार करणाऱ्यांना लेखक अमरजीत आमले आणि दिग्दर्शक विजय कलमकर यांनी या चित्रपटातून अ’ दर्जाचं उत्तर दिलं आहे. लोकचळवळीतून साकारलेला हा सिनेमा धनाढ्य पाठबळाशिवायही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो आहे — आणि आता त्याला अधिकाधिक लोकाश्रयाची गरज आहे.
तगडी स्टारकास्ट आणि संघटनांचा पाठिंबा
या चित्रपटात वैभव मांगले, सुनील तावडे, वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, साईंकीत कामत, स्वानंदी टिकेकर यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. मराठी चित्रपटविश्वातील या प्रभावी कलाकारांनी आपल्या सशक्त अभिनयाने चित्रपटाला वेगळी उंची दिली आहे. दरम्यान, ग्लोबल कोकण, मराठी एकीकरण समिती आणि शिवस्वराज्य मराठी फेरीवाला संघटना या संघटनांनी या चित्रपटामागे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यकर्त्यांच्या पाठिंब्याची वेळ आता आलीच आहे
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो महाराष्ट्राच्या मातीचा, संस्कृतीचा आणि सामान्य माणसाच्या भावविश्वाचा सिनेमा आहे. त्यामुळे आता मराठी राज्यकर्त्यांनी आणि सांस्कृतिक संस्थांनी या अस्सल मराठी चित्रपटामागे उभं राहण्याची खरी वेळ आली आहे — कारण हीच ती वेळ आणि हाच तो क्षण, जेव्हा मराठी सिनेमाला आपल्या मातीतूनच पुन्हा बळ मिळू शकतं.
