‘प्रेमाची गोष्ट २’ — एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची अनोखी गोष्ट

आधुनिक काळातील प्रेमाचे वास्तव सांगणारा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टिझर आणि गाणी आधीच चर्चेत असताना, नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. भव्य ट्रेलर लाँच सोहळ्यात प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी चित्रपटातील ‘ओल्या सांजवेळी २.०’ आणि ‘ये ना पुन्हा’ या गाण्यांवर सुंदर नृत्य सादर करत वातावरण रंगवलं.

ट्रेलरमध्ये प्रेम, नातं आणि नशिबाचा संगम

ट्रेलरमध्ये ललितच्या आयुष्यातील भावनिक वळणं ठळकपणे दाखवली आहेत — लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम. स्वतःच्या चुकांचा आणि नशिबाचा हिशेब करताना तो देवालाच दोष देतोय. मात्र, देव त्याला खरंच दुसरी संधी देणार का? आणि दिलीच, तरी त्याचं नशिब खरंच बदलणार का? हे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुततात. चित्रपटात आजच्या काळातील प्रेमाचे वास्तव, बदलती नाती, डिजिटल संवादाचे स्वरूप आणि अत्याधुनिक व्हीएफएक्सचा सुंदर मिलाफ आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ या ट्रेलरमधून आधुनिक तंत्रज्ञान, संवेदनशील भावना आणि सतीश राजवाडे यांच्या खास दिग्दर्शनशैलीचा संगम अनुभवायला मिळतो.

सतीश राजवाडे यांचा नवा प्रयोग आणि कुटुंबांसाठी सुसंगत कथा

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “ही एक फ्रेश, आजच्या काळाशी सुसंगत अशी प्रेमकहाणी आहे. या चित्रपटात व्हीएफएक्स केवळ दृश्य सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर कथा सांगण्याचा नवा मार्ग म्हणून वापरला आहे. ही कथा जेन झी प्रेक्षक आणि त्यांच्या पालकांना जोडणारी आहे, म्हणजेच संपूर्ण कुटुंबासाठी योग्य अशी प्रेमकथा आहे.”

निर्माते संजय छाब्रिया आणि सतीश राजवाडे यांची यशस्वी जोडी पुन्हा एकदा एकत्र

निर्माते संजय छाब्रिया म्हणाले, “सतीशसोबत हा माझा चौथा चित्रपट आहे. आम्ही नेहमीच प्रेक्षकांसाठी मनाला भिडणाऱ्या आणि वेगळेपणा जपणाऱ्या कथा सादर केल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही त्याच परंपरेतील एक संवेदनशील आणि आधुनिक प्रेमकथा आहे. आजच्या पिढीच्या भावनांना अचूक स्पर्श करणारी ही कथा सतीश राजवाडे यांनी ज्या संवेदनशीलतेने साकारली आहे, ती प्रेक्षकांना नक्की भावेल.”

भव्य कलाकारसंघ आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणारा चित्रपट

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास’ प्रेक्षकांना २१ ऑक्टोबर, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनुभवायला मिळणार आहे.

Leave a comment