‘दामिनी’ पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला!

नव्या रूपात, नव्या दिमाखात सह्याद्रीवर ‘दामिनी २.०’

“सत्यता शोधण्या, घेऊनी लेखणी, जाहली दामिनी, मूर्त सौदामिनी…” हे गाणं वाजलं की प्रत्येक घरातला सदस्य दूरदर्शनच्या पडद्यासमोर बसून जाई. कारण त्या काळी ‘दामिनी’ ही फक्त मालिका नव्हती — ती होती न्यायासाठी लढणाऱ्या स्त्रीची प्रेरणादायी कथा. दूरदर्शन सह्याद्रीवरील पहिली दैनंदिन मालिका म्हणून ‘दामिनी’ने इतिहास रचला होता. तब्बल पाच वर्षांचा कालावधी, १५०० भाग, आणि अनेक गुणी कलाकार-तंत्रज्ञांच्या सहभागासह, या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली.

तीस वर्षांनंतर नव्या दमात परतणारी ‘दामिनी’

तीस वर्षांनंतर ही लोकप्रिय मालिका नव्या रूपात, नव्या कथासूत्रासह पुन्हा त्याच वाहिनीवर परत येत आहे. ‘दामिनी २.०’ या नावाने सजलेला दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला १३ ऑक्टोबरपासून सायं ७.३० वा. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. नव्या काळाची, नव्या पिढीची ‘दामिनी’ आता पत्रकारितेच्या जगतात आपल्या आजीच्या वारशावर आधारित न्यायासाठी पुन्हा सज्ज झाली आहे.

किरण पावसे आणि ध्रुव दातारची नवी जोडी झळकणार मुख्य भूमिकेत

या नव्या मालिकेत साताऱ्याची अभिनेत्री किरण पावसे मुख्य व्यक्तिरेखेत झळकणार असून, तिच्यासोबत पुण्याचा ध्रुव दातार नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या जोडीने मालिकेला ताजेपणा आणि नव्या उत्साहाची झलक दिली आहे. विशेष म्हणजे, जुन्या मालिकेतील लोकप्रिय जोडी सुबोध भावे आणि क्षिती जोगही या मालिकेत विशेष भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना नवी झळाळी मिळणार आहे.

गौतम अधिकारींची मूळ संकल्पना आणि कांचन अधिकारींचं दिग्दर्शन

मालिकेची मूळ संकल्पना दिवंगत गौतम अधिकारी आणि मार्कंड अधिकारी यांची असून, कथा-पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी कांचन अधिकारी यांनी सांभाळली आहे. एपिसोड दिग्दर्शन विठ्ठल डाकवे यांनी केले असून, कथाविस्तार आणि संवादलेखन अभिजित पेंढारकर यांचं आहे. या मालिकेची निर्मिती मुंबई दूरदर्शनने केली आहे.

‘दामिनी २.०’ — सत्य, न्याय आणि स्त्रीशक्तीचा प्रवास पुन्हा एकदा सुरू

नव्या काळातही ‘दामिनी’ची जिद्द, तिचं धैर्य आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची वृत्ती तीच आहे. या नव्या रूपातली ‘दामिनी’ प्रेक्षकांना पुन्हा एकदा न्याय, नातं आणि आत्मविश्वासाचा प्रेरणादायी प्रवास अनुभवायला लावणार आहे.

‘दामिनी २.०’ पाहायला विसरू नका — सोमवार ते शुक्रवार, सायं ७.३० वा., दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर!

Leave a comment