
आयएनॉक्स, नरिमन पॉईंट येथे ५०० आशा आणि अंगणवाडी सेविकांसह भावस्पर्शी सोहळा
जागतिक कन्या दिनाच्या औचित्याने दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील आणि निलेश कुवर यांचा आगामी मराठी चित्रपट ‘आशा’ याची विशेष स्क्रीनिंग मुंबईतील आयएनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडली. या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डॉ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. जवळपास ५०० आशा आणि अंगणवाडी सेविका उपस्थित राहून या चित्रपटातील आशयाला आणि त्यामागील संवेदनशीलतेला भरभरून दाद दिली.
महिलांच्या सामर्थ्याची आणि सेवाभावाची प्रेरणादायी कथा ‘आशा’

चित्रपटाच्या निमित्ताने महिलांच्या सामर्थ्याचा आणि आशा सेविकांच्या निःस्वार्थ कार्याचा गौरव करण्यात आला. निर्मात्या दैवता पाटील म्हणाल्या, “जेव्हा एक स्त्री घराच्या चौकटीबाहेर पाऊल टाकते, तेव्हा तिला असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं. पण ती थांबत नाही — तिच्या चिकाटीने, ध्येयाने आणि आत्मविश्वासाने ती पुढे जात राहते. ‘आशा’ ही फक्त एका आरोग्य सेविकेची गोष्ट नाही, तर ती प्रत्येक स्त्रीच्या जिद्दीची, संघर्षाची आणि सामर्थ्याची कहाणी आहे.”
‘आशा’ला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांचा मानाचा तुरा
‘आशा’ चित्रपटाने आधीच आपला ठसा उमटवला आहे. ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांत या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री या विभागांत पारितोषिके मिळाली आहेत. आरोग्यसेविकांच्या सेवाभावावर आधारित हा चित्रपट महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि संघर्षाचा भावस्पर्शी प्रवास दाखवतो.
दिग्दर्शक दीपक पाटील यांचा प्रामाणिक दृष्टिकोन आणि संवेदनशील दृष्टीकोन
दिग्दर्शक दीपक पाटील यांनी सांगितलं, “सध्या मराठी सिनेमा नव्या वाटा शोधत आहे. विविध आणि आशयपूर्ण विषयांवर चित्रपट निर्माण होत आहेत. एका शिबिरादरम्यान मला आशा सेविकांचं काम जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि त्यांचं योगदान पाहून मन हेलावलं. त्यांच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे — म्हणूनच ‘आशा’ ही गोष्ट जगासमोर आणायची ठरवलं.” ते पुढे म्हणाले, “हा सिनेमा फक्त आरोग्यसेविकांचा नाही, तर घर सांभाळून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आहे.”
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा उपक्रम — समाजातील स्त्रियांच्या भूमिकेला सलाम
या कार्यक्रमाचं आयोजन डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. डॉ. शिंदे म्हणाले, “चित्रपट हे समाजप्रबोधनाचं सशक्त माध्यम आहे. ‘आशा’ हा सिनेमा समाजातील अत्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित घटकावर — आशा सेविकांवर — आधारित आहे. आपल्या गावखेड्यात आरोग्यसेवा आणि जनजागृतीसाठी अखंड झटणाऱ्या या महिलांची कहाणी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.”
रिंकू राजगुरूच्या दमदार भूमिकेतून साकारलेली ‘आशा’
चित्रपटात मुख्य भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू झळकणार असून तिच्यासोबत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, हर्षा गुप्ते आणि दिलीप घारे यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचं लेखन अंतरिक्ष श्रीवास्तव आणि दीपक पाटील यांनी केलं असून, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनुभवी छायाचित्रकार सुरेश सारंगम यांनी कॅमेराची धुरा सांभाळली आहे.
‘आशा’ हा सिनेमा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर तो प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनाला स्पर्श करणारा आणि तिच्या संघर्षाच्या कहाणीला आवाज देणारा आहे.
