‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

ध्येय, संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कथा आता पडद्यावर

कोणत्याही यशस्वी डॉक्टरची ओळख केवळ त्याच्या कौशल्यातून होत नाही, तर त्याच्या रुग्णांच्या कथा आणि व्यथांमधून घडत असते. एखाद्या जीवावर बेतलेली परिस्थिती असताना, उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रत्येक क्षणी नवी परीक्षा होत असते. त्या संघर्षात तो खंबीर राहिला तरच जगासमोर ‘ताठ कण्यानं’ उभा राहू शकतो. अशाच एका ध्येयवेड्या आणि संशोधनात झोकून दिलेल्या डॉक्टरच्या जीवनाची कथा म्हणजे — ‘ताठ कणा’.

डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या विलक्षण आयुष्यावर आधारित कथा

जगप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. पी. एस. रामाणी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट त्यांच्या अथक प्रयत्नांचा आणि आत्मविश्वासाचा प्रवास उलगडतो. आज ८६ वर्षांचे असूनही रोज ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरीसाठी सज्ज असणाऱ्या या डॉक्टरांच्या आयुष्याची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

संघर्ष आणि यशाचा रोमांचकारी प्रवास

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून डॉक्टर होण्याचा ध्यास घेतलेल्या रामाणी यांनी परदेशात शिक्षण घेताना मोठ्या आरोपांना सामोरे गेले, पण त्यातून ते निश्चयाने बाहेर पडले. उच्चपदस्थ नोकरी नाकारून त्यांनी भारतात परत येऊन वैद्यकीय क्षेत्रात नव्या वाटा तयार केल्या. द्वेष, असूया आणि अविश्वासाच्या वातावरणातही त्यांनी अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणला. त्यांच्या संशोधनाची एक दिवस अशी कसोटी लागली की सगळ्यांची नजर त्यांच्याकडे वळली — आणि त्याचवेळी ‘प्रेमा’च्या हाकेने त्यांना आणखी एका संघर्षाच्या मार्गावर नेले.

उमेश कामत आणि दीप्ती देवी प्रमुख भूमिकेत

या चित्रपटात उमेश कामत डॉ. रामाणींची भूमिका साकारत असून, त्यांच्या सोबत दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे, अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई आणि संजीव जोतांगिया यांसारखे अनुभवी कलाकार झळकणार आहेत.

तांत्रिक बाजू आणि संगीताची जादू

चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले असून, लेखन श्रीकांत बोजेवार यांचे आहे. छायांकन कृष्णकुमार सोरेन यांचे, संकलन निलेश गावंड यांचे आणि कलादिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे आहे. संगीतकार अविनाश–विश्वजीत यांच्या सुरांनी सजलेला हा सिनेमा भावनांना भिडणारा ठरेल.

‘प्रज्ञा क्रिएशन्स’ चे विजय मुडशिंगीकर आणि ‘स्प्रिंग समर फिल्म्स’ चे करण रावत यांनी निर्मिती केलेला ‘ताठ कणा’ — संघर्ष, जिद्द आणि प्रेमाच्या शक्तीचा असामान्य प्रवास २८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment