
चित्रपटाची महती
क्रियायोगाचे आद्य प्रवर्तक श्री महावतार बाबाजी — हजारो वर्षांपासून हिमालयाच्या पावन भूमीवर संचार करणाऱ्या या दिव्ययोग्याचा आध्यात्मिक स्पर्श मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच ‘फकिरीयत’ या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. आध्यात्म, श्रद्धा, गुरूभक्ती आणि तपश्चर्येची वाटचाल सांगणारा हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
गुरूभक्तीच्या संघर्षाची कथा
‘फकिरीयत’ हा चित्रपट गुरूमाई माँ रुद्रात्मिका यांच्या आध्यात्मिक प्रवासावर आधारित आहे. श्री महावतार बाबाजींसह श्री रामकृष्ण परमहंस, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, बाबा श्री कालभैरव, बाबा भद्रबाहू, हेडाखान बाबा आणि माँ काली यांच्या अध्यात्मिक परंपरेचे दर्शन यात घडते. ही केवळ भूमीवरील साधनेची कथा नाही, तर गुरूने दिलेल्या कार्यासाठी शिष्याला करावा लागणाऱ्या अंतःप्रवासाची गाथा देखील आहे.
निर्मिती आणि दिग्दर्शन
‘फकिरीयत’ची निर्मिती भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स LLP यांनी केली असून दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांचे आहे. कथा गुरूमाईंच्या ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म – एक विद्रोह, एक क्रांती’ या पुस्तकांवर आधारित असून पटकथा आणि संवाद अनिल पवार आणि गुरूमाई यांनी संयुक्तपणे लिहिले आहेत.
फकीरियत म्हणजे काय?
गुरूमाईंच्या म्हणण्यानुसार —
“फकीरियत ही जात–धर्माच्या पलीकडची वृत्ती आहे. सर्व सामर्थ्य असूनही कोणत्याही आसक्तीपासून मुक्त राहणे — ही फक्त बाह्य साधना नाही, तर अंतःकरणाची विशालता आहे.”
संगीताची आध्यात्मिक मेजवानी
चित्रपटातील भजन-भक्तीगीतांना संगीतकार प्रवीण कुंवर यांनी संगीत दिले आहे. “चलो चले हम बाबाजी के देस…”, “गुरु मै तेरे शरण…” अशा रचना प्रेक्षकांच्या अंतःकरणाला भक्तिभावाची अनुभूती देतात.
कलाकार
चित्रपटात
दीपा परब, उदय टिकेकर, विनीत शर्मा, अक्षय वर्तक, नयन जाधव, अनीषा सबनीस
यांच्या भूमिका असून विशेष भूमिकेत संतोष जुवेकर झळकणार आहेत.
तांत्रिक बाजू
सिनेमॅटोग्राफी — अजित रेड्डी
संकलन — निलेश गावंड
अध्यात्म, त्याग आणि आत्मशोधाच्या प्रवासाचा अनुभव देणारा ‘फकिरीयत’ — २८ नोव्हेंबरपासून प्रदर्शित.
